अरुण बारसकरसोलापूर: संपूर्ण कर्जमाफी होईल या अपेक्षेवर आजही शेतकरी अवलंबून बसला असून, दीड लाखावरील रक्कम भरण्यासाठी शेतकरी तयार नाहीत. यामुळे एकरकमी परतफेड(ओटीएस) योजनेसाठी पात्र असलेल्या ९ हजार ८०१ शेतकºयांनी मुदतवाढ दिल्यानंतरही पैसे भरलेले नाहीत.
राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना २४ जून २०१६ रोजी जाहीर केली. त्यानंतर आॅनलाईन अर्ज केलेल्या शेतकºयांच्या दीड लाखापर्यंतचे थकबाकीदार, दीड लाखावरील थकबाकीदार व नियमित कर्ज भरणारे शेतकरी अशा तीन प्रकारच्या ‘ग्रीन’ याद्या बँकांना पाठविल्या. जिल्हा मध्यवर्ती बँकेला ३० मे रोजी ९ वी ग्रीन यादी आली होती. या सर्व ९ याद्यांतील दीड लाखापर्यंतच्या ४५ हजार ४६० थकबाकीदारांची २८८ कोटी २० लाख १७ हजार ३५० रु़ रक्कम बँक खात्यावर जमा करण्यात आली. नियमित पैसे भरणाºया ३० हजार ६०४ शेतकºयांच्या खात्यावर प्रोत्साहन म्हणून ५७ कोटी १८ लाख ६० हजार ८७५ रुपये जमा करण्यात आले.
एकरकमी परतफेड(ओटीएस) योजनेसाठी १६ हजार ९९७ शेतकरी खातेदार पात्र होते. या सर्व शेतकºयांकडे दीड लाखापेक्षा अधिक कर्ज थकलेले आहे. शासनाने दीड लाखावरील रक्कम भरण्याचे आवाहन शेतकºयांना केले. शेतकºयांनी कर्जाची दीड लाखावरील रक्कम भरली तरच शासनाकडून दीड लाख रुपये शेतकºयांच्या कर्ज खात्यावर जमा केले जातात. शासनाने अगोदर डिसेंबर १७ नंतर मार्च १८, जून १८ व नंतर ३० सप्टेंबरपर्यंत दीड लाखावरील रक्कम भरण्यासाठी मुदत दिली होती.
बँकांचा कर्ज वसुलीसाठी जून हा महिना असल्याने शासनाने व बँकेने जून महिन्यात दीड लाखावरील रक्कम भरण्यासाठी विशेष मोहीम राबवली. दीड लाखावर काही रुपये थकबाकी असणाºयाच शेतकºयांनी ओटीएसमध्ये सहभाग घेतला व रक्कम भरली. ही रक्कमही कर्ज रुपाने पुन्हा देण्याची हमी बँकेच्या अधिकाºयांकडून घेण्यासही शेतकरी विसरले नाहीत.
ओटीएससाठी पात्र असलेल्या १६ हजार ९९७ शेतकºयांपैकी ७ हजार १९६ शेतकºयांनी दीड लाखावरील रक्कम भरली असून, ९ हजार ८०१ शेतकरी कर्ज भरण्यास तयार नाहीत. बँक व विकास सोसायटीचे सचिव दीड लाखावरील रक्कम भरण्याचे आवाहन करण्यासाठी शेतकºयांकडे येरझºया करतात, त्यावेळी सरकार सर्वच कर्ज माफ करणार असल्याचे शेतकरी सांगतात. यामुळे दीड लाखावरील थकबाकीदारांची बाकी मोठ्या प्रमाणावर दिसत आहे.
तीन महिन्यांत अवघे ४८२ शेतकरी...- जून ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ४८२ शेतकºयांनी ओटीएस योजनेत दीड लाखावरील कर्ज भरले. या शेतकºयांकडे दीड लाखावर अवघी काही रक्कमच थकबाकी होती. १० हजार २८३ शेतकरी ओटीएससाठी पात्र असताना केवळ ४८२ शेतकरी पैसे भरण्यासाठी पुढे आले.
ओटीएसमध्ये पैसे भरण्यासाठी शासनाने डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शेतकºयांनी दीड लाखावरील रक्कम भरली तर त्यांचे खाते कोरे होणार आहे. पीक असेल तर नव्याने कर्ज मिळेल.- शैलेश कोतमिरेप्रशासक, जिल्हा बँक