करमाळा तालुक्यात हल्ला केलेले चिखलठाण, फुंदेवाडी, लिंबेवाडी, अंजनडोह या गावांपासून माढा तालुका अवघ्या तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. माढा तालुक्यातील कन्हेरगाव, दहीवली, उपळवाटे, पिंपळखुटे, ढवळस, रोपळे, कव्हे, अकुलगाव, लव्हे, नाडी, मुंगशी,म्हैसगाव यांसारख्या गावांतही संबंधित बिबट्यासंबंधी उपाययोजना करीत ग्रामस्थांतून सतर्कता दिसू लागली आहे.
अशी घेतली जातेय दक्षता
या भागात सायंकाळी वाड्या वस्त्यांवरून नागरिक जागता पहारा देत असल्याचे दिसत आहे. बिबट्याबाबत जनजागृती मोहीम सुरू झाली आहे. येथील नागरिकांनी व शेतकऱ्यांनीदेखील सायंकाळी शेतात जाणे बंद केले आहे. दिवस पाळीतच आपल्या शेतातील कामे उरकण्याचे नियोजन केले आहे. एक -दोघे शेतात जाणे बंद केले असून, त्या-त्या भागातील शेतकरी एकत्र मिळून आपापल्या शेतात काम करीत आहेत. यावेळी ते आपल्याजवळ काठी, कुऱ्हाडीसारखी हत्त्यारे बाळगत आहेत. लहान मुलांना आपल्या घराच्या अंगणातच खेळण्यासाठी परवानगी देत आहेत. जनावरेही दारातच बांधून ठेवत आहेत.
---
आम्ही जरी माढा तालुक्यातील असलो तरी बिबट्याने हल्ला केलेल्या करमाळा तालुक्यातील त्या गावांंपासून आमचे गाव अगदी तीस चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे तिकडील बिबट्याची भीती आमच्याही गावांत पसरू लागली आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिक व शेतकरी याबाबत सतर्क झाले असून, काळजी घेतली जात आहे.
- तात्यासाहेब गोडगे, सरपंच, रोपळे/- धनंजय मोरे, माजी उपसरपंच, कन्हेरगाव.