सोलापूर : अखेर सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार शुक्रवारी सकाळी फायनल झाला. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष भारत जाधव व कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी आत्ताच माजी महापौर मनोहर सपाटे यांना पक्षाचा ए/बी फॉर्म दिला.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत शहर उत्तरची जागा प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहे. पण या जागेवर उमेदवार ठरत नव्हता. सपाटे यांनी शहर उत्तरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याबाबत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. ही जागा सुटल्यावर मात्र सुरूवातीला त्यांनी निवडणूक लढविण्यास अडचण सांगितली. त्यामुळे पक्षापुढे पेच निर्माण झाला होता.
भाजपा—सेना युतीत असंतुष्ट राहिलेले कोण हाती लागते काय याची चाचणी पदाधिकाºयांकडून सुरू होती. पण आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने व नवीन उमेदवार हाती न लागल्याने पक्षाकडून आलेला ए/बी फॉर्म सपाटे यांना देण्यात आला. त्यामुळे शहर उत्तरसाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात अखेर उमेदवार ठरला आहे. विशेष म्हणजे सन २0१४ च्या निवडणुकीत सपाटे यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. आता ते पक्षातर्फे निवडणूक रिंगणात उतरत आहेत.