अकलूज : ‘अमर रहे, अमर रहे एव्हरेस्टवीर निहाल बागवान अमर रहे’ अशा घोषणा देत अकलूजकरांनी जड अंत:करणाने एव्हरेस्टवीर निहाल अशपाक बागवान यांना अखेरचा निरोप दिला.
अकलूज येथील गिर्यारोहक निहाल अशपाक बागवान याचे २३ मे रोजी एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर परतत असताना ऑक्सिजनच्या अभावी निधन झाले़ २४ मे रोजी नेपाळ सरकारने निहाल व त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी ६ जणांचा चमू एव्हरेस्टवर पाठवली. निहालचे पार्थिव सापडल्यानंतर २९ मे रोजी नेपाळ व भारत सरकारमध्ये कागदपत्रांची पूर्तता होऊन पार्थिव दि़ ३० मे रोजी भारताच्या स्वाधिन करण्यात आले. दिल्लीतून विमानाने पुणे आणि त्यानंतर शुक्रवारी पहाटे सहाच्या सुमारास अॅम्ब्युलन्सद्वारे गणेशनगर-अकलूज येथील राहत्या घरी पार्थिव आणण्यात आले. सकाळी ७ ते १० पर्यंत नातेवाईकांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून अंत्ययात्रा काढण्यात आली. अकलूजच्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे दैनंदिन व्यवहार बंद ठेवले होते. सकाळी ११ वाजता नमाज पठण करून मसूदमळा येथील मुस्लिम कब्रस्तानात दफन विधी पार पडला.
सात वर्षांत भारतात आणलेला पहिला मृतदेहएव्हरेस्ट शिखर सर करताना अनेक गिर्यारोहकांचा मृत्यू होतो. एव्हरेस्ट शिखराच्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत हेलीकॉप्टर जात असल्याने त्या टप्प्यापर्यंतचे मृतदेह आणणे सोपे पडते. परंतु चौथ्या टप्प्यापासून मृतदेह आणणे अत्यंत कठिण व खर्चिक असते. परंतु भारतीय दूतावास व नेपाळ दुतावासातील समन्वयामुळेच निहालचा मृतदेह भारतात आणण्यात यश मिळाले.