आप्पासाहेब पाटील
सोलापूर : काेरोनाकाळात खंडित झालेली रेल्वेची प्रवासी सेवा आता रूळावर आली आहे. मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातून दररोज ११० एक्स्प्रेस गाड्यांमधून २० हजार प्रवासी रेल्वेने प्रवास करीत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. शिवाय सर्वसामान्यांच्या १० पॅसेंजर गाड्याही रूळावर आल्याचे सांगण्यात आले.
कोरोनाकाळात केंद्र व राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले होते. या निर्बंधांमुळे रेल्वेची प्रवासी सेवा खंडित करण्यात आली होती. कोरोनाकाळात रेल्वेने फक्त विशेष एक्स्प्रेस गाड्या चालविल्या. शिवाय मालवाहतूक, किसान व पार्सल गाडयांमधून रेल्वे गाड्यांनी उत्पन्न मिळवून दिले. प्रवासी सेवा खंडित झाल्याने रेल्वेच्या उत्पन्नात मोठी घट झाली होती; मात्र कोरोना आटोक्यात आल्याने रेल्वे मंत्रालयाने रेल्वेची प्रवासी सेवा रूळावर आणली. या निर्णयामुळे प्रवाशांना चांगला दिलासा मिळत आहे.
-----------
सध्या सुरू असलेल्या गाड्या...
- सिध्देश्वर एक्स्प्रेस
- हुतात्मा एक्स्प्रेस
- हुसेनसागर एक्स्प्रेस
- - कोणार्क एक्स्प्रेस
- - उद्यान एक्स्प्रेस
- - विशाखापट्टणम एक्स्प्रेस
- - कर्नाटक एक्स्प्रेस
- - गदग एक्स्प्रेस
-------------------
जनरल तिकीट बंदच...
सध्या सोलापूर विभागातून एक्स्प्रेस, मेल व पॅसेजर गाड्या धावत आहेत. या गाड्यांमधून प्रवास करताना फक्त आरक्षित तिकीट असणाऱ्यांनाच प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. शिवाय प्रवास करताना मास्क व आरटीपीसीआर प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. रेल्वे प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे.
------------
रात्री धावणाऱ्या गाड्यांत फुकटेच अधिक...
जनरल डबा असो की वातानुकूलित, सर्वच डब्यांत आरक्षित तिकीट अनिवार्य आहे. आरक्षित तिकीट असणाऱ्यांना रेल्वेत बसण्याची परवानगी आहे. मात्र वेटिंग तिकीट असतानाही अनेकजण रेल्वेने प्रवास करतात. शक्यतो रात्री धावणाऱ्या सर्वच गाड्यांत विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी अधिक असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्राने दिली.
----------
कोरोनाच्या संकटातून देशातील परिस्थिती सुधारली आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्रवासी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोलापूर विभागातून ११० एक्स्प्रेस गाड्या धावत आहेत. शिवाय १० पॅसेंजर गाड्याही धावत आहेत. प्रवासी देवदर्शन, पर्यटन व कामानिमित्त रेल्वेने अधिक प्रवास करीत आहेत.
- प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य मंडल व्यवस्थापक, सोलापूर मंडल