सोलापूर: २६ फेब्रुवारीपासून सुरू झालेले वादळ वारे काही केल्या शेतकऱ्यांची पाठ सोडेनासे झाले आहे. सातत्याने घरांच्या पडझडी व शेतीपिकांचे नुकसान अखंडपणे सुरू आहे. शुक्रवारी झालेल्या वादळाने नुकसानीत मोठी भर टाकली आहे.पावसाचे यावर्षीचे चित्र विचित्रच दिसत आहे. २६ फेब्रुवारीपासून वादळ, गारपीट, पाऊस सुरू असतानाच शुक्रवारी जिल्ह्यात चक्रीवादळ झाले. पावसाळ्यात कधी तरी पडणाऱ्या विजा आता दररोजच ंअन् कोठेही पडू लागल्या आहेत. भिंतीवर, झाडावर तसेच थेट माणूस व जनावरांवरही पडत आहेत. शुक्रवारी पडलेला पाऊस काही प्रमाणात फायद्याचा असला तरी अधिक पटीने नुकसानीचा ठरला आहे. सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नुकसानही तेवढेच झाले आहे. विविध गावात वीज पडल्याने ९ जनावरे मृत्युमुखी पडली. अनेक घरांवरील पत्रे उडाल्याने कुटुंबे उघड्यावर पडली. बार्शी शहरात राऊळ गल्लीतील शिक्षक प्रवीण पवार यांचे घर पडल्याने त्यांच्या पत्नी पूनम पवार यांचा मृत्यू झाला. जोराच्या वादळाने झाडे उन्मळून पडली तर घरांवरील पत्रेही उडाले. अनेक लोक जखमी झाले. अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री साखर कारखान्याचे २० कोटींचे नुकसान झाले असून चपळगावमधील एका बैलाचा मृत्यू झाला आहे. अनेक गोठ्यांचे नुकसान झाले असून ५०० हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत.-------------------------६ जून रोजी पडलेला पाऊसउत्तर सोलापूर- १४.२८ मि.मी.,दक्षिण सोलापूर-९.७४ मि.मी., बार्शी-१४.८६ मि.मी.,अक्कलकोट-५.६ मि.मी., पंढरपूर-१४.८६ मि.मी., मंगळवेढा-१५.९४ मि.मी., सांगोला-५९.९४ मि.मी., माढा-४.७७ मि.मी., मोहोळ-१२.५८ मि.मी., करमाळा-३.६३ मि.मी., माळशिरस-००.०० मि.मी. एकूण १५९.२६ मि.मी. तर सरासरी १४.४८ मि.मी. एक जून ते ६ जूनपर्यंत एकूण २९२.८८ मि.मी. तर सरासरी २६.६३ मि.मी. पाऊस पडला.
दररोजच वादळ अन् दररोजच नुकसान
By admin | Published: June 08, 2014 12:44 AM