सोलापूर : राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण राज्याचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या हस्तस्पर्शाने पुनित झालेले सोन्याचे नाणे सोलापुरातील किशोर चंडक यांनी जतन करून ठेवले आहे. हे नाणे म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्ष असल्याने याचे विशेष महत्त्व आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या राज्याभिषेकावेळी हे नाणे काढले. एका बाजूला श्री राजा शिव, मागच्या बाजूला छत्रपती असे देवनागरी लिपीमध्ये लिहिले आहे. राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला या नाण्याने झाली होती. सुवर्णतुलानंतर जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांनी ही नाणी स्वहस्ते लोकांना मानानुसार दिली होती. त्यामुळे प्रत्येक नाण्याला त्यांचा स्पर्श झालेला आहे. आज देशभरात अशी फक्त सात ते आठच नाणी उपलब्ध आहेत.
...म्हणून नाणी झाली दुर्मीळशिवरायांनी १६७४ मध्ये राज्याभिषेकावेळी काढलेली नाणी रयतेला वाटली. पण रयतेने त्याचे दागिने बनवले. औरंगजेबाने महाराजांवरील द्वेषापोटी ही नाणी मोडली. त्यामुळे नाणी कमी झाल्याचे किशोर चंडक यांनी सांगितले.