सोलापूर : मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन घेऊन जाणाºया व मतदान झाल्यावर गोदामापर्यंत मशीन परत आणण्यासाठी वापरण्यात येणारी वाहने तसेच सर्व पथके व निवडणुकीच्या अनुषंगाने येणाºया सर्व वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या पूर्व तयारीबाबतचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपायुक्त चव्हाण, पिंपळगावकर, शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, महापालिका आयुक्त दीपक तावरे, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त म्हैसेकर यांनी निवडणूक तयारीचा आढावा घेतला. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. भोसले यांनी तयारीबाबत माहिती दिली. सोलापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाºयांनी दिव्यांग मतदारांची मतदान केंद्रनिहाय माहिती घ्यावी. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारासाठी आवश्यक असलेल्या रॅम्प, व्हिल चेअर या सुविधा उपलब्ध केल्याची खातरजमा करावी. दिव्यांगांना या सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस विभागाने दक्षता घ्यावी. त्याप्रमाणे एस.एस.टी.टीममध्ये किमान एक शस्त्रधारी पोलीस उपलब्ध करून दिला पाहिजे.
या कालावधीत आवश्यक असलेले पोलीस, मनुष्यबळ बाहेरुन मागविण्याचे नियोजन करावे. परवानाधारक शस्त्रे जमा करून घ्यावीत व जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत काळजी घ्यावी अशा पोलीस अधिकाºयांना सूचना दिल्या. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकाºयांनी आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे व काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशा सूचना दिल्या. विविध समित्यांच्या बैठका वेळोवेळी घ्याव्यात. कर्मचाºयांचे प्रशिक्षण व इतर यंत्रणा कार्यान्वित करावी असेही सांगितले. निवडणुकीच्या कामांसाठी झालेला खर्च व्यवस्थित दाखविण्यात यावा, साहित्य खरेदी व उपाययोजनेबाबतच्या खर्चात बोगसगिरी टाळण्यात यावी, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सूचित केले.