सोलापूर - मुलाला डॉक्टर केल्यानंतर सुखाचे दिवस बघण्याची आशा असतानाच शांताबाई काळे यांच्या मुलाचे अपघाती निधन झाले. मोठा आधार कोसळला. चाळीस वर्षे लावणी कला जोपासणाऱ्या आणि या लावणीच्या बळावर मुलाला मोठे केलेल्या डॉ. किशोर काळे यांच्या आई शांताबाई काळे या आज अत्यंत दयनीय अवस्थेत आयुष्य जगत आहेत. राहत्या घरासाठी त्यांचा संघर्ष सुरू असून दोनवेळच्या जेवणाचाही प्रश्न आहे. यासंदर्भात लोकमतने वृत्त दिल्यानंतर प्रहार संघटनेनं याची दखल घेतली असून आता माजी मंत्री आ. बच्चू कडू हे शांताबाईंच्या मदतीसाठी आले आहेत. यासंदर्भात त्यांनी फोनवरुन शांतबाईशी संवादही साधला.
निवृत्त कलावंत म्हणून मिळणारे १५०० रुपये मानधन आणि डॉक्टर काळे यांच्या पुस्तकाची रॉयल्टी एवढ्यावरच शांताबाईं दैनंदिन उदरनिर्वाह करत आहेत. तेही कलावंतांचे मानधन वेळेवर मिळत नाही. तीन-तीन महिने विलंब होतो. राहायला घर नाही. भाड्याने तर कधी इतरत्र राहावे लागते. भाडं द्यावं की पोट भरावं असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा परिस्थितीतून त्यांना रोजचे जीवन जगावं लागत आहे. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच बच्चू कडूंनी शांताबाईंच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.
आता इथून पुढे जोपर्यंत शांताबाईंच पक्क घर तयार होत नाही, तोपर्यंत घराचं भाडं आणि उदरनिर्वाहाची जबाबदारी प्रहार जनशक्ती पक्षाने दाखवली आहे. तसेच, लवकरात लवकर दोन पक्क्या खोल्या बांधून दाखवण्याची ही जबाबदारी प्रहार जनशक्ती पक्ष घेणार आहे, असे प्रहार जनशक्ती संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी सांगितले. त्यामुळे शांताबाईंच्या घराची प्रतीक्षा सध्या तरी संपल्याच दिसून येते. दरम्यान, शांताबाईंचं फोनवरुन बच्चू कडूंशी बोलणंही कुलकर्णी यांनी करुन दिलं.
भारुडांची बदली झाली अन् प्रश्न रेंगाळला
'कोल्हट्याच पोर' या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक डॉ. किशोर काळे यांच्या आई आणि लोककलावंत शांताबाई काळे यांना 'कोणी घर देत का घर' असं म्हणण्याची वेळ आली होती. सोलापूरच्याकरमाळा तालुक्यातील नेरल्यात तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी शांताबाईंच्या घरासाठी जागा मिळवून दिली होती. मात्र, भारुडांची बदली झाली आणि हा विषय मागे पडला. त्यामुळे एकेकाळी महाराष्ट्रभर नावाजलेल्या लोककलावंत शांताबाई काळे यांना भाड्याच्या घरात कसेबसे दिवस काढण्याची वेळ आली आहे.