फिर्यादी हे मंगळवेढा पोलीस ठाण्यात ऑर्डली रूममध्ये सरकारी काम करीत होते. यावेळी धुळदेव अनुसे याने १९ जुलै रोजी सकाळी १०.३०वा. पोलीस ठाण्यात येऊन फिर्यादी काम करीत असलेल्या खोलीत जाऊन फिर्यादीच्या छातीवर मोबाइल फेकून मारून, भिंतीवर ढकलून हाताने मारहाण करून जखमी केले. टेबलवरील गुन्ह्याची कागदपत्रे फेकून दिली. फिर्यादीला मारहाण करीत असताना, इतर कर्मचारी मदतीला धावून आले. त्यांनाही धक्काबुक्की करून शिवीगाळी, दमदाटी केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. संबंधित माजी सैनिकाने धुडगूस घालत, पोलीस स्टेशन गेटवर लावलेले लाइटचे दिवेही फोडल्याचे सांगण्यात आले.
मागील तीन महिन्यांपूर्वीही कुऱ्हाड घेऊन पोलीस ठाण्यात येऊन काम करीत बसलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर याच माजी सैनिकाने कुऱ्हाडीच्या दांड्याने मारून जखमी करत संगणक व खिडक्यांची तावदाने फोडून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले होते. मागील दीड वर्षापूर्वीही असाच प्रकार घडला होता. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी या कामी लक्ष घालून भविष्यात असा प्रकार घडणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी होत आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कोळी करीत आहेत.