सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा सोमवार, १९ जून पासून सुरु होणार असल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली.
विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. रजनीश कामत, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. गौतम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. शहर व जिल्ह्यातील एकूण ७० हजार विद्यार्थी परीक्षा देतील. संलग्न १०९ महाविद्यालये व विद्यापीठातील ११ संकुलातील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. ८० केंद्रांवर या परीक्षा होणार आहेत. १९ जून पासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा नियोजित असून त्या संदर्भात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर केले.