विठ्ठल खेळगी
सोलापूर : प्रेमाच्या अतिरेकातून खून करणे किंवा दुस-यांकडून करवून घेणे अशा घटना अलीकडे सर्वत्र वाढल्या आहेत. सोलापुरात अशा काही घटना घडल्या आहेत. एखादी मुलगी लग्न करून सासरी गेल्यानंतरही काही टाळकी पोरं त्या मुलीच्या आयुष्यात लुडबुड करतात. अशामुळे मुलीच्या आयुष्याची राखरांगोळी झाल्याच्या घटना घडत आहेत. अशा एकतर्फी प्रेमातून निर्माण होणा-या गुन्हेगारीला रोखणे गरजेचे आहे.
एकतर्फी प्रेम म्हणजे नक्की काय? तिच्या न कळत तिला पाहायचं... तिची नजर पडताच आपण मागे वळायचं... ती आपली नाही होऊ शकणार... तरीही तिच्यावर खूप प्रेम करायचं... प्रेमभंग झाल्यानंतर मात्र गुन्हेगारीकडे वळायचं... ही प्रवृत्ती वाढत चाललेली आहे. सोलापूर शहरात एकतर्फी प्रेमातून खूनच्या घटना अलीकडच्या काळात घडल्या नसल्या तरी, प्रेमाच्या अतिरेकातून मारहाण व तोडफोड झाल्याच्या घटना घडत आहेत. कोरोना महामारीमुळे अशा प्रेमाच्या घटना कमी घडल्या आहेत. त्या आधी शहरात घटना घडत होत्या. ग्रामीण भागातही एकतर्फी प्रेमामुळे अनेक मुलींचे लग्न मोडले आहे. इज्जतीला घाबरुन या घटना गावातल्या गावात मिळवून टाकतात.
अल्पवयीन मुलीला एकतर्फी प्रेमातून जाळून टाकण्याची घटना मोहोळ तालुक्यातील घडली होती. लग्नास नकार देणा-या प्रेयसीच्या अंगावरून रॉकेल ओतून घरातील स्टोव्हवर ढकलले आणि स्वत: तेथून पसार झाला होता. मुलगी पूर्णपणे भाजून मरण पावली. यात आरोपी शरद गायकवाड याला जन्मठेप झाली आहे.
देगाव रोडवरील न्यू लक्ष्मी चाळ येथेही एकतर्फी प्रेमातून विवाहितेचा खून झाला होता. प्रियंका हिच्यावर तिच्या लग्नपूर्वीपासून एक जण प्रेम करीत होता. ती माहेरी आल्यानंतर तिचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली. त्यात आरोपीला अटक झाली होती.
प्रेमप्रकरणातून फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक असलेल्या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. प्रेमप्रकरणातून फुटबॉलपटू प्रदीप अलाट यास बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. एका आरोपीच्या बहिणीचे मृत प्रदीपसोबत प्रेमसंबंध असल्याने मारहाण करण्यात आल्याचा आरोपही मित्रांनी केला. याप्रकरणी एका नगरसेवकांच्या मुलासह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला होता.
एकतर्फी प्रेमातून गुन्हे वाढले
एकतर्फी प्रेमातून गुन्हे वाढले आहेत. सोशल मीडियामुळे या घटना वाढत आहेत. महाविद्यालयीन जीवनात एका मुलीच्या प्रेमात पडल्यानंतर प्रेम मिळविण्यासाठी मुले कोणत्याही थराला जातात. प्रेमभंग झाल्यावर व प्रेमाला झिडकारल्यानंतर न कळत्या वयात मुले टोकाचे पाऊल उचलतात. त्यातून गुन्हेगारीचा उगम होतो. एकतर्फी प्रेमातूनच गुन्हे वाढत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या वर्षभरात एकतर्फी प्रेमातून खुनाची घटना घडलेली नाही. एकतर्फी प्रेमाच्या तक्रारी आल्यानंतर समुपदेशनाद्वारे समजूत काढण्यात येते. तोडगा न निघाल्यास कारवाई करण्यात येते. मागील वर्षी अशा प्रेमप्रकरणातून एका फुटबॉलपटूचा खून झाला होता.
- वैशाली कडूकर, पोलीस उपायुक्त, सोलापूर