चपळगाव मंडलातील विशेषतः चपळगाव, हन्नूर, डोंबरजवळगे, बोरेगाव, बऱ्हाणपूर, पितापूर, चुंगी, किणी, दर्शनाळ, कुरनूर, चुंगी, अरळी, बावकरवाडी, सिंदखेड, मोट्याळ, दहिटणे आदी गावांतील शेतकरी प्रामुख्याने दरवर्षी खरीप हंगामातील तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, भुईमूग, मका, बाजरी आदी पिकांचे उत्पादन घेतात. या वर्षीही खरीप पिकांवर बहुतांश शेतकऱ्यांनी भर दिला आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून पडणारा रिपरिप पाऊस शेतकऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण करत आहे. कोळपे मारण्यासाठी वापसाच नसल्याने या वर्षी खरीप पिकांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर तण वाढले आहे. परिणामी, पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. औषध मारण्यासाठी उपयुक्त परिस्थिती नाही. अनेक दिवसांपासून सूर्यदर्शन नाही. यामुळे पिकांचे भवितव्य अंधारात जाणार आहे.
कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात चपळगाव मंडलात सरासरीच्या २४० टक्के पाऊस पडला आहे, तर पावसाळा सुरू झाल्यापासून सरासरीच्या १७२ टक्के इतका पाऊस पडल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत.
----
आता आधार फक्त पीकविम्याचाच!
सद्यस्थितीत जास्तीच्या पावसाने मूग व उडीद पिकांना फटका बसला आहे. कित्येकांच्या शेतात पाणी असल्याने उभी खरीप पिके कुजत चालली आहेत. संपूर्ण वर्षाचे अर्थकारण खरीप पिकांवर अवलंबून असते. मात्र, जास्तीच्या पावसाने खरीप पिके हातून गेल्यात जमा आहेत. आता आधार आहे तो भविष्यात पीकविम्याची रक्कम मिळण्यावरच.
- बिरप्पा बंदीछोडे, कृषी व्यवसायिक, हन्नूर.
-------
230721\20210710_121826.jpg
प्रमाणापेक्षा जास्त पडलेल्या पावसाने चपळगाव मंडलातील कित्येकांच्या शेतात पाणी थांबल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत.