सोलापूर : सोलापूर व माढा लोकसभा निवडणुकीचा प्रचार रविवारी सायंकाळी पाच वाजता थांबला आहे. मतदान ७ मे २०२४ रोजी होणार असून येत्या दोन दिवसात अवैध दारूची वाहतूक, वाटप अन्य अवैध कामं होण्याचा संशय आहे. या सर्व गोष्टींवर करडी नजर ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने या कालावधीत जिल्हाभरात एकूण बारा पथके नेमण्यात आली असून या पथकांकडून रात्रंदिवस धाबे, हॉटल, संशयित मद्य विक्री ठिकाणे, हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणे इत्यादी ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत.
याशिवाय वागदरी (ता. अक्कलकोट), नांदणी (ता. दक्षिण सोलापूर) व मरवडे (ता. मंगळवेढा) या ठिकाणी कर्नाटक राज्य सीमेवरील सीमा तपासणी नाक्यांवर वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. अधीक्षक व उप अधीक्षक यांच्याकडून रात्रीच्या वेळी परिसरात गस्त घालण्यात येत असून कुठेही दारूची वाहतूक किंवा वाटप होणार नाही यावर कडक लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितले.
आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण ४०२ गुन्ह्यात ३२३ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या कारवाईत विभागाने १२६५४ लिटर हातभट्टी दारू, १ लाख ७३ हजार १२० लिटर गुळमिश्रित रसायन, ७०५ लिटर देशी दारू, ३४५ लिटर विदेशी दारू, २०६ लिटर बियर, सतराशे सत्तावीस लिटर ताडी, २४३ लिटर गोवा राज्यातील दारू व ४७ वाहने जप्त केली आहेत. जप्त केलेल्या दारू व इतर साहित्याची किंमत ८९ लाख १८ हजार असून वाहनांसह एकूण जप्त मुद्देमालाची किंमत १ कोटी ३६ लाख ८५ हजार इतकी आहे. जिल्हाधिकारी सोलापूर कुमार आशीर्वाद यांच्या आदेशान्वये निवडणूक मतदान संपण्याच्या ४८ तासापूर्वी म्हणजेच ५ मे सायंकाळी सहा वाजेपासून ड्रायडे घोषित करण्यात आला असून सर्व मद्य विक्री दुकाने सात मे रोजी मतदान संपेपर्यंत बंद राहतील असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी कळविले आहे.