दीपक दुपारगुडे
सोलापूर : शेकापच्या ताब्यातील सांगोला येथील शेतकरी महिला सहकारी सूत गिरणीच्या शेअर्सची रक्कम अपूर्ण असल्याचे कारण पुढे करीत अंतिम मतदारयादीतून एकाच वेळी २४ हजार सभासद वगळले आहेत. आता अंतिम यादीमध्ये केवळ २,३५६ सभासद राहिले आहेत. सूतगिरणीच्या या निर्णयाविरोधात काही सभासदांनी थेट न्यायालयात धाव घेतल्याचे सांगण्यात आले.
सांगोला तालुक्यातील महिलांसाठी रोजगार निर्मिती उपलब्ध व्हावी, यासाठी शेकापचे ज्येष्ठ नेते स्व. भाई गणपतराव देशमुख यांनी शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूतगिरणीची उभारणी केली. या सूतगिरणीच्या उभारणीसाठी सोलापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा जिल्ह्यातील सुमारे २६ हजार महिलांनी शेअर्स खरेदी करून आर्थिक हातभार लावला.
येत्या महिनाभरात शेतकरी महिला सहकारी सूतगिरणीची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, सोलापूर यांच्या कार्यालयाने शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूत गिरणीची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत कापूस उत्पादक गटात १ हजार ६२९, बिगर कापूस उत्पादक गटात ७२१ व संस्था गटात ६ अशा २ हजार ३५६ सभासदांची यादी प्रसिद्ध केली आहे. शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूतगिरणीच्या सभासदांनी शेअरची रक्कम अपूर्ण असल्याचे कारण पुढे करून अंतिम मतदारयादीतून सुमारे २४ हजार सभासदांची नावे वगळण्यात आली आहेत.