सोलापूर : सतत काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा माणसाला कर्तुत्ववान बनवते. या अशाच धडपडीतून नवे करण्याचा प्रयत्न विश्वजीतकुमार बनसोडे या तरुणाने केला आहे. त्याने अफ्रिकेत काढलेल्या फोटोंचं प्रदर्शन भरवत जर्मनी गाजविली. त्याने काढलेले फोटो पाहून परदेशातील नागरिकांनीही त्याचे कौतुक केले.
विश्वजीतकुमार बनसोडे हा सोलापूरचा तरुण. त्याने पर्यावरणशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले. श्री सिद्धेश्वर हायस्कूल, दयानंद महाविद्यालयातून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. सध्या तो जर्मनी येथील कोब्लेन्ज या विद्यापीठात संशोधन करत आहे. यासाठी रवांडा विद्यापीठाचे सहकार्य मिळाले.
मागील सात महिन्यांमध्ये तो अफ्रिका खंडातील रवांडा, युगांडा, केनिया, बूरंडी या देशात फिरला. या दरम्यान त्याने अनेक फोटो काढले. यापुर्वी सोलापुरातील दयानंद महाविद्यालयात पर्यावरण संवर्धन हा विषय घेत प्रदर्शन भरविले जात होते. त्याप्रमाणेत आता त्याने अफ्रिकेत काढलेल्या या फोटोंचे प्रदर्शन जर्मनी येथे भरवले होते. त्याच्या या प्रदर्शनाला जर्मनीतल्या पर्यावरणप्रेमींनी दाद देत कौतुक केले.इन्क्रेडीबल अफ्रिका
विश्वजीतने इन्क्रेडीबल अफ्रिका या नावाने जर्मनी इथल्या महाविद्यालयात फोटोंचे प्रदर्शन भरविले होते. तिथली वन्यजीवसृष्टी, संस्कृती व प्रदेश यांचे चित्रण त्याने आपल्या कॅमेऱ्यातून केले. अफ्रिकेत आढळणारे पशू, पक्षी व तिथल्या स्थानिक नागरिकांचे फोटो काढले.