अनुभव; युद्धग्रस्त युक्रेनहून परतलो खरे.. पण, सतावतेय भविष्याची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 03:04 PM2022-03-07T15:04:06+5:302022-03-07T15:04:12+5:30

बंकरमधील वाईट अनुभव : सोलापुरातील ३६ पैकी ३३ विद्यार्थी भारतात

Experience; True, I returned from war-torn Ukraine, but I'm worried about the future | अनुभव; युद्धग्रस्त युक्रेनहून परतलो खरे.. पण, सतावतेय भविष्याची चिंता

अनुभव; युद्धग्रस्त युक्रेनहून परतलो खरे.. पण, सतावतेय भविष्याची चिंता

Next

सोलापूर : देशभरातील विद्यार्थी हे युद्धग्रस्त युक्रेन देशात अडकले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ३६ विद्यार्थी युक्रेनमध्ये होते. त्यातील ३३ विद्यार्थी भारतात परतले आहे. सुखरूप भारतात परतल्याचा विद्यार्थ्यांना आनंद असला, तरी त्यांचा भविष्याची चिंता सतावत आहे. युद्ध न थांबल्यास पुढील अभ्यासक्रम कसा पूर्ण होईल हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.

रशिया- युक्रेन वादात भारत सरकार तटस्थ राहिल्याने त्याचा राग हा भारतीय विद्यार्थ्यांवर काढला जात आहे. सोलापूरचे विद्यार्थी रोमानियाच्या सीमेवर असताना तिथे विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. या मारहाणीत सोलापूरच्या विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. अनेक किलोमीटर चालत जावे लागले.

----

वेफर्स खाऊन जगलो..

सोलापूरचे विद्यार्थी बंकरमध्ये अडकले असताना पाणी व खाण्यासाठीही मोठा संघर्ष करावा लागला. पावाचे तुकडे खाऊन दिवस ढकलावा लागला. विमानतळावर गेल्यावरही हा संघर्ष थांबला नाही. एका विद्यार्थिनीने वेफर्स खाऊन दिवस ढकलले. भारत सरकारकडून उशिरा मदत मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.

------

  • युक्रेनमध्ये शिकत असलेले जिल्ह्यातील विद्यार्थी - ३६
  • परतलेले विद्यार्थी - ३३
  • परतण्याच्या प्रतीक्षेत असलेले विद्यार्थी- ३

---------

पुढील शिक्षण कसे पूर्ण करता येईल याबाबत आमच्या विद्यापीठाकडून अद्याप सांगण्यात आलेले नाही. ज्यांचा प्रवेश मार्चमध्ये त्यांचे वर्ष संपले असून, त्यांना नवीन वर्षासाठी प्रवेश घ्यावा लागतो. सप्टेंबर बॅचचे विद्यार्थ्यांचे सेमीस्टर अजून संपलेले नाही.

- अक्रुर कदम, विद्यार्थी, डेनप्रो युनिव्हर्सिटी, युक्रेन

 

विद्यापीठाकडून ऑनलाईन पद्धतीने लेक्चर घेण्याचा विचार सुरू आहे. आम्हाला शिकवणारे शिक्षक हे स्थानिक असल्याने त्यांना अधिक अडचणी येत आहेत. त्यामुळे पुढील शिक्षण कसे पूर्ण होईल, याची आम्हाला काळजी आहे.

- प्रसाद शिंदे, विद्यार्थी, चर्निवेस्ट युनिव्हर्सिटी, युक्रेन

युद्धग्रस्त देशात बंकरमध्ये आमची मुले अडकली होती. त्यावेळी त्यांना धीर देण्याशिवाय दुसरा पर्याय आमच्यापुढे नव्हता. नेटवर्कच्या अडचणीमुळे त्यांच्याशी संपर्क झाला नाही, तर आम्हाला भीती वाटत होती. सगळी मुले धाडसी असल्याने ते भारतात परतले.

- हरिदास सावंत, पालक

 

 

Web Title: Experience; True, I returned from war-torn Ukraine, but I'm worried about the future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.