सुहास ढेकणे सोलापूर : पिंपळगाव (ता. बार्शी) येथील शेतकरी नितीन घावटे यांनी प्रत्यक्ष उत्पादन मिळवून देणारी एअरप्रुनिंग द्राक्षशेती विकसित केली आहे. यामुळे पहिल्याच वर्षी उत्पादन मिळणार असल्याने फायद्याचे ठरणार आहे.
पारंपरिक लागवड पध्दतीने द्राक्षबागेतून उत्पन्न मिळवायचे म्हटले की, दोन वर्षांचा कालावधी जातो. रुटस्टॉक लागवड करुन एक वर्षात ते कलम करण्यासाठी पक्व होते. कलमानंतर वेल फाउंडेशनवर जाण्यासाठी पुन्हा वर्षभर वाट पाहावी लागते. त्यामध्ये वेळ, श्रम, पैसा यांचा मोठा खर्च सोसावा लागतो. मात्र आता एअरप्रुनिंग तंत्रज्ञानाद्वारे दोन वर्षांऐवजी पहिल्याच वर्षी उत्पादन मिळविता येणार आहे. या तंत्रज्ञानाद्वारे द्राक्षची यशस्वी लागवड घावटे यांनी केली आहे. या प्रयोगातून पिंपळगावचे माळरान फुलले आहे. आधुनिकतेची कास धरुन शेती केली तर शेती तोट्यात जाऊ शकत नाही, हे या शेतकºयाने दाखवून दिले आहे.
अवघ्या दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या या शेतकºयाने आंतरराष्ट्रीयस्तरावरील तंत्रज्ञानाचा वापर करुन ही नवीन पध्दत विकसित केली आहे. याचा लाभ अन्य शेतकºयांनाही मिळावा, यासाठी त्यांनी शेतीबरोबरच रोपनिर्मिती प्रक्रियाही सुरू केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने द्राक्ष वाणाची काडी व आपल्याला हवी असलेली उत्पादनाची काडी एकत्रित करून एकजीव करण्यात येते. प्रयोगशाळेत आवश्यक तापमानात त्या काडीला मुळी फुटते. त्यानंतर सात ते आठ दिवसांत रोप पूर्ण तयार होते. त्यामुळे पाहिजे त्या वाणाच्या कलमी रोपांची लागवड थेट शेतामध्ये करता येते. खूपच वेळखाऊ व प्रचलित प्रक्रियेतून कलम करणाºया असंख्य द्राक्ष उत्पादकांना आता उत्तम दर्जाची कलम केलेली रोपेच मिळणार आहेत. हे नवीन तंत्रज्ञान द्राक्ष शिवारात नुकतेच दाखल झाले असून, त्यामुळे उत्पादन वेळेत मोठी बचत होणार आहे.
या नव्या पद्धतीत पूर्णपणे ग्राफ्ट (कलम) केलेले रोपच लागवड केले जात असल्यामुळे पहिल्याच वर्षापासून उत्पादन सुरू होते. प्रारंभी ग्राफ्टेड रोपांची लागवड काही ठिकाणी होत असली तरी त्यासाठी रोपवाटिका करणाºयास आधी एक वर्षापासून तयारी करावी लागते. नूतन तंत्रज्ञानात ग्राफ्टिंगसाठी यंत्रांचा वापर होत असल्यामुळे ते खात्रीशीर एकजीव होऊन त्यांना लवकर मुळ्या फुटण्यासाठी प्रयोगशाळेत योग्य त्या तापमानाची सोय केली जाते. त्यानंतर ठराविक तापमान व आर्द्रता असलेल्या एका चेंबरमध्ये रुटस्टॉक आणि सायन एकजीव करण्याची प्रक्रिया केली जाते. तिला ‘कॅलसिंग’ असे म्हणतात.
काडीच्या खालच्या बाजूला कोकोपीट असलेले प्लग लावले जातात. त्यामुळे तिथे मुळ्या फुटतात. ती मुळी पुढील ३0 दिवसांत विकसित केली जाते. त्यानंतर पुढील आठ दिवस बाह्य वातावरणाची सवय करण्यासाठी प्रयत्न केले जातात. अशी ३८ दिवसांत ग्राफ्टिंगची प्रक्रिया पूर्ण होऊन रोप लागवडीयोग्य होते. या प्रक्रियेत रुट आणि वाणाची काडी सर्व बाजूने एकरुप होते. या नव्या तंत्रज्ञानात ग्राफ्टिंगसाठी यंत्रांचा वापर केला जातो. त्यामुळे ते १०० टक्के एकजीव होते. इतकेच नव्हे तर त्यांना लवकर मुळ्या फुटण्यासाठी प्रयोगशाळेत योग्य त्या तापमानाची सोय केली जाते. यामुळे वेळेमध्ये प्रचंड बचत होते. पारंपरिक पद्धतीशी तुलनात्मक एअरप्रुनिंग या प्रक्रियेत रुट आणि वाणाची काडी सर्व बाजूने एकरुप होते.