सोलापूर : रजेचा अर्ज प्रलंबित ठेवून पैसे कोणी मागितले व मानसिक त्रास कोणी दिला याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी नाेटीस जिल्हा परिषदेने ग्लोबल टीचर रणजित डिसले यांना दिल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
डिसले यांना अमेरिकेतील फुलब्राइट संस्थेची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. डॉक्टरेट करण्यासाठी अमेरिकेत येत्या ऑगस्टमध्ये जाण्यासाठी संस्थेला जिल्हा परिषदेच्या परवानगीचे पत्र २५ जानेवारीपर्यंत सादर करणे आवश्यक होते. मात्र डिसले यांचा अर्ज शिक्षण विभागाने दीड महिना प्रलंबित ठेवला. पाठपुरावा केल्यावर मानिसक त्रास दिला व पैशाची मागणी करण्यात आली, असा आरोप डिसले यांनी केला.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणाची दखल घेतली व डिसले यांना तत्काळ परवानगी देण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे प्रशासनाने त्यांना परवानगी दिली. परंतु डिसले यांच्या आरोपामुळे प्रशासनाची प्रतिमा मलिन झाल्याने प्रशासनाने सोमवारी डिसले यांना खुलासा करण्याची नोटीस बजावल्याचे सीईओ स्वामी यांनी स्पष्ट केले.