आप्पासाहेब पाटील, सोलापूर: फ्रिजच्या गॅस टाकीचा स्फोट होऊन घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना १७ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास गावडी दारफळ (ता. उ. सोलापूर) येथे घडली.
फुलाबाई शाहू काळे यांच्या स्वयंपाक घरातील फ्रीजच्या गॅस टाकीचा स्पोट होऊन संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाले. फुलाबाई काळे या शेतमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. कामावरून घरी आल्यानंतर आपल्या स्वयंपाक घरात असलेल्या देवघरातील देवासमोर अरती लावली होती. लावलेल्या आरतीतील जळती वात उंदराने स्वयंपाक घरात असलेल्या इलेक्ट्रिक बोर्डाकडे ओढत नेली, त्यामुळे जळत्या वातीने इलेक्ट्रिक बोर्डाला आग लागली. याचवेळी फ्रिजमधील असलेल्या गॅस टाकीचा स्फोट झाला. या स्फोटामुळे स्वयंपाक घरातील जर्मनच्या डब्यात ठेवलेली रोख रक्कम ५० हजार रुपये, फ्रिज, कुलर, टीव्ही, फॅन, भांडी ,लोखंडी कपाटातील कपडे, गहू, ज्वारी, तांदूळ, शेंगा व दिवाळीच्या सणाला आकाश कंदील बनवण्यासाठी आणलेले २५ हजार रुपयांचे साहित्य या आगीत वस्तू जळून खाक झाले असल्याचे स्वतः फुलाबाई काळे सांगत होत्या.