पंढरपूर : पंढरपूर पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर पक्षाने पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेनेतून हाकलपट्टी केली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामानातून ही घोषणा करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. याविषयी शैला गोडसे यांच्याशी संपर्क साधला असता शिवसेना महाविकास आघाडीत सामील असल्याने पक्षाची अडचण आपण समजू शकतो, तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे पक्षाच्या कारवाई विरोधात आपण काहीही बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले, मात्र जनतेच्या रेट्यामुळे आपण निवडणूक लढविण्यावर ठाम आसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पंढरपूर पोटनिवडणूक आता दुरंगी न होता शैला गोडसे, स्वाभिमानीचे सचिन शिंदे व अपक्षांमुळे बहुरंगी होण्याची चिन्हे आहेत.