सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या अभय योजनेला १५ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आयुक्त शितल तेली-उगले यांनी घेतला असल्याची माहिती उपायुक्त विद्या पोळ यांनी दिली आहे.
महापालिकेचा थकीत मिळकतकर भरण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या अभय योजनेला आता १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती उपायुक्त विद्या पोळ यांनी दिली.महापालिकेने १३ नोव्हेंबरपासून ही योजना सुरू केली होती. या योजनेची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत होती. या योजनेंतर्गत थकीत मिळकतकर एकवट भरणार्यांना शास्ती, नोटीस-वॉरंट फीमध्ये ८० टक्के सवलत देण्यात येत होती. दरम्यान या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने तसेच मुदतवाढीची मागणी होत असल्याने मनपा आयुक्तांनी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गंत नोव्हेंबरअखेर एकूण 20 कोटींची वसुली झाली असून शेवटच्या दिवशी म्हणजे बुधवारी (ता. ३०) साडेचार कोटी वसूल झाले. मिळकतदारांना या योजनेंर्गत एकूण पाच कोटींची सवलत मिळाली आहे.
महापालिकेने ५० हजारापेक्षा जास्त कर थकीत ठेवणार्यांना याआधीच जप्तीच्या नोटिसा बजाविल्या होत्या. त्याची मुदतदेखील संपली आहे, मात्र केवळ अभय योजनेमुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही, आता मात्र कारवाई केली जाणार आहे. तसेच या अभय योजनेचा सोलापूरकरांनी लाभ घ्यावा असे आव्हान उपायुक्त विद्या पोळ यांनी केले.