तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना तत्काळ उपचार मिळावेत. यासाठी प्रशासनाकडून पंढरपूर तालुक्यात १९ डेडिकेडेड कोविड हॉस्पिटल व डेडिकेडेड कोविड हेल्थ सेंटरला मान्यता देण्यात आली आहे. राज्य शासनाने कोरोनाच्या उपचारासाठी चाचणी तसेच रुग्णालयातील उपचाराबाबत रक्कम निश्चित केली आहे तरीही खासगी रुग्णालयांकडून जादा बिलाची आकारणी केली जात असल्याची तक्रारी येत आहेत. त्यामुळे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी शहरातील हॉस्पिटलच्या बिलाचे लेखापरीक्षण करण्यासाठी पथकाची नियुक्ती केली आहे. यामध्ये उपकोषागार अधिकारी संजय सदावर्ते, सहाय्यक निबंधक सुदाम तांदळे, लेखापरीक्षक आर. आर. फाटके, सहकार अधिकारी पी. बी. सावंत, उपअभियंता पाटबंधारे एन. एस. ताटी, राहुल गरड, रमेश माळी हे पथक प्रमुख आहेत. या पथकांनी शहरातील १५ खासगी रुग्णालयातील ५४० बिलांची तपासणी करून ७ लाख ३ हजार ७०० रुपये कमी करण्यात आले आहे. गरीब व गरजू रुग्णांचे हित डोळ्यांसमोर ठेवून खासगी रुग्णालयांनी जास्तीत-जास्त गरजू रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचाही लाभ मिळवून द्यावा. खाजगी रुग्णालयांनी कोरोनाबाधित तसेच इतर रुग्णांच्या उपचारासाठी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार आकारणी करावी, असे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
या हाॅस्पिटलनी आकारले जादा बिल
गॅलक्सी हॉस्पिटल, लाईफ लाईन हॉस्पिटल, श्री गणपती हॉस्पिटल, जनकल्याण हॉस्पिटल, श्री विठ्ठल हॉस्पिटल, जगताप हॉस्पिटल, डॉ. पावले हॉस्पिटल, वरद विनायक हॉस्पिटल, मेडिसिटी हॉस्पिटल, पडळकर हॉस्पिटल, विठाई हॉस्पिटल, डीव्हीपी हॉस्पिटल, विठ्ठल रुक्मिणी हॉस्पिटल, ॲपक्स हॉस्पिटल, ऑक्सिजन पो. हॉस्पिटल या हाॅस्पिटलची तपासणी केली असता यामध्ये रुग्णांना अधिक बिल आकारण्यात आल्याचे प्रांत अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.