पंढरपूर तालुक्यात मार्च महिन्यापासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. ही संख्या लक्षात घेता तालुका प्रशासनाने कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. बाधित रुग्ण घरातच थांबत असल्याने संपूर्ण कुटुंब बाधित होण्याची शक्यता आहे. यासाठी नागरिकांनी सूचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले.
‘त्या’ गावात पोलिसांची रात्रंदिवस गस्त
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. ज्या गावात कोरोना बाधित रुग्णांची संख्या जास्त आहे, त्या गावात पोलीस प्रशासनातर्फे दिवस-रात्र गस्त सुरु आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी, दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जे नागरिक उपचाराविना घरीच थांबले आहेत यांची माहिती घेऊन त्यांना तत्काळ उपचारासाठी पाठविण्यात येत असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.
कोट :::::::::::::::::
तालुक्यातील प्रत्येक गावात ग्रामस्तरीय समितीची बैठक घेऊन कोणताही कोरोना बाधित रुग्ण गृह विलगीकरणात राहणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक गावात कोविड केअर सेंटर सुरु केले आहे. जे रुग्ण घरीच उपचार घेत आहेत यांची आरोग्य पथकामार्फत माहिती घेऊन त्यांना तत्काळ उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे.
सुशील बेल्हेकर
तहसीलदार, पंढरपूर
फोटो : ग्रामीण भागातील ग्रामस्थांची कोरोनाची चाचणी करताना आराेग्य कर्मचारी.