सोलापूर : उशिराने गाळपास येणाऱ्या उसाला जादा दर देण्याचा निर्णय कारखान्याच्या व्यवस्थापनाने घेतल्याची माहिती श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी दिली.
सध्या कारखाना पूर्ण क्षमतेने उसाचे गाळप करीत असला तरी वाढत्या उन्हामुळे आणि संभाव्य पाणीटंचाईमुळे ऊस उत्पादक शेतकरी गाळपासाठी लवकर ऊस नेण्याची मागणी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर १ ते १५ फेब्रुवारीपर्यंत गाळपास येणाऱ्या उसाला प्रति टन ७५ रुपये देण्यात येणार आहे. १५ फेब्रुवारीनंतर हंगाम संपेपर्यंत ऊस पुरवणाऱ्या शेतकऱ्याला प्रतिटन १५० रुपये देण्यात येणार आहे. कारखान्याने एफआरपीप्रमाणे एक रकमी प्रतिटन २१६० रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर यापूर्वीच जमा केले आहेत.
फेब्रुवारीनंतर ऊस तोडणी कामगार आणि वाहतूक ठेकेदारांची बिले रोजच्या रोज त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय कारखान्याच्या संचालक मंडळाने घेतला आहे. यंदाच्या हंगामासाठी कारखान्याकडे नोंद केलेल्या संपूर्ण उसाचे गाळप केल्याशिवाय कारखाना बंद केला जाणार नाही असे काडादी यांनी सांगितले .