सोलापूर : पूज्य श्री वीरेश्वर महाशिवशरण यांच्या पुण्यस्मृती शतमानोत्सवानिमित्त बुधवारी सायंकाळी लक्ष-लक्ष दीपोत्सवांनी बाळीवेस येथील अव्ववरु मठाचा (श्री वीरेश्वर पुण्याश्रम) परिसर उजळून निघाला.
शतमानोत्सवास १२ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला. १२ रोजी काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य यांच्या दिव्य सान्निध्यात अय्याचार आणि शिवलिंग दीक्षा देण्याचा सोहळा पार पडला. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता श्री वीरेश्वर महाशिवशरणांच्या तैलचित्रांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत शेकडो सुवासिनी जलकुंभ घेऊन सहभागी झाल्या होत्या. मिरवणुकीचा शुभारंभ होटगी मठाचे मठाधिपती धर्मरत्न डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य यांच्या हस्ते झाला. पुण्यतिथीच्या शतमानोत्सवाचा समारोप बुधवारी रात्री लक्ष-लक्ष दीपोत्सव अन् धर्मसभेने झाला. श्रीशैल पीठाचे जगद्गुरु श्री चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजींच्या उपस्थितीत दीपोत्सवाचा प्रारंभ झाला.
सहभागी मान्यवर आणि भाविकांनी एकेक दिवा लावत दीपोत्सवात रंगत आणली. त्यानंतर दुधनीचे पूज्य श्री जडेयशांतलिंगेश्वर यांचे आशीर्वचन झाले. प्रारंभी त्यांनी पुलवामा येथील शहीद जवानांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली. जगात सुख, शांती, आनंद लाभावा यासाठी सर्वांनी एकोप्याने, गुण्यागोविंदाने राहण्याचा सल्ला देताना काही कानमंत्र दिले. सर्वच जाती-धर्मातील वंचित घटकांच्या जीवनात प्रकाश येण्यासाठी आजचा हा दीपोत्सव कार्यक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी गुळेदगुड्डचे पूज्य श्री वप्पतेश्वर महास्वामी, किरीटेश्वर मठाचे मठाधिपती पूज्य श्री स्वामीनाथ महास्वामीजींची प्रमुख उपस्थिती होती. वेदमूर्ती बसवराज शास्त्री, डॉ. शिवयोगी स्वामी होळ्ळीमठ यांनी पौरोहित्य केले.
यावेळी महापौर शोभा बनशेट्टी, पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, सिद्रामप्पा अबदुलपूरकर, श्री सिद्धेश्वर यात्रेतील मानकरी राजशेखर हिरेहब्बू, तम्मा मसरे, सुधीर थोबडे, महेश थोबडे, चिदानंद वनारोटे, नंदकुमार मुस्तारे, सुदीप चाकोते आदी उपस्थित होते. दीपोत्सव यशस्वी करण्यासाठी सकलेश विभूते, मल्लिकार्जुन सोन्ना, बसवराज गाभणे, इरण्णा तेगेळ्ळी, गुरुपाद तंबाके आदींनी परिश्रम घेतले.
हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद- पुण्यतिथीच्या शतकमानोत्सवानिमित्त बुधवारी सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत श्री मल्लिकार्जुन मंदिरात भाविकांसाठी महाप्रसाद आयोजित केला होता. शेकडो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.