राज्यभर अतिवृष्टीने धुमाकूळ घातला आहे. दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. संततधार सुरू असल्याने सर्वत्र पाणीच पाणी पसरत आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील धरणे भरून ओसंडत आहेत. उजनी धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील भीमा, सीना, भोगावती, हरणा, बोरी नद्यांना कोणत्याही स्थितीत महापूर येण्याची शक्यता आहे. साहित्याविना पूरस्थितीवर मात करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची अवस्था दयनीय झाली आहे.
गेल्या दहा वर्षांत चार वेळा भीमा आणि सीना नद्यांना महापूर आल्याने नदीकाठच्या जनतेची अवस्था बिकट झाली आहे. मागील वर्षी सीना नदीने पात्र बदलले तर भीमेच्या पुरात मोठे नुकसान झाले. महिन्यापूर्वी लवंगी येथे तीन शाळकरी बालकांचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. बचावाचे कोणतेही साहित्य जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडे नाही याची प्रचिती त्याच वेळी आली होती. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे दोन कोटींच्या शोध आणि बचाव साहित्याची मागणी केल्याचे सांगण्यात आले होते. अद्यापपर्यंत मागणीची दखल घेण्यात आली नाही.
-------
मागणी केलेले शोध, बचाव साहित्य
रबर/ रेस्क्यू बोटी ( १३), सर्चलाइट (२६), लाइफबॉय (६५), सेफ्टी हेल्मेट (६५), मेगाफोन (२६), फ्लोटिंग पंप (५), ब्रीदिंग अप्रायटस (१३) या साहित्याच्या खरेदीसाठी दोन कोटींची मागणी करण्यात आली आहे. राज्य शासनाने मागणीची दखलच घेतली नाही.
-------
१० वर्षांपूर्वी साहित्य खरेदी
सोलापूर जिल्ह्यात वारंवार पूर परिस्थिती निर्माण होते. भीमा-सीना नदीच्या काठी मानवी वसाहती वाढल्या आहेत. महापुराने मनुष्य आणि जनावरे वाहून जाण्याचे प्रमाणही वाढले आहे. मात्र आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्यातून कोणताच बोध घेतला नाही. १० वर्षांपूर्वी शोध आणि बचाव साहित्य खरेदी केले होते. हे साहित्य जीर्ण होऊन नष्ट झाले, तरीही शासनाने दहा वर्षांत कोणतीच खरेदी केली नाही. यावरून आपत्ती व्यवस्थापन समितीचे गांभीर्य दिसून येते.
------
एप्रिल महिन्यांत राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे साहित्य खरेदीसाठी २ कोटी निधीची मागणी करण्यात आली आहे. त्याचा वारंवार पाठपुरावा सुरू आहे.
- चंद्रकांत हेडगिरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, सोलापूर
------
लवंगी येथील दुर्घटनेनंतर प्रशासनाने बोध घ्यायला हवा होता. महापूर सांगून येत नाही. आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास मदतकार्य कसे करणार याबाबत शासन गंभीर नाही. दोन महिन्यांपूर्वी मी स्वतः सचिवांशी बोललो . पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालायला हवे. साहित्य खरेदीसाठी निधीची तातडीने तरतूद करायला हवी.
- सुभाष देशमुख, आमदार, दक्षिण सोलापूर
-----