फडणवीस, अजितदादांचे सरकार बहुमत सिद्ध करू शकणारच नव्हते !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 03:39 PM2019-11-27T15:39:05+5:302019-11-27T15:42:12+5:30
आधीच होता सोलापूरकरांना विश्वास: महाविकास आघाडीचेच राज्य येणार असल्याचेही भाकित केले होते
सोलापूर : मुंबई उच्च न्यायालयाने फडणवीस व अजितदादांच्या सरकारला चोवीस तासांत विश्वासदर्शक ठराव घेण्याचे आदेश दिल्यावर लोकांच्या मनात काय चालले आहे हे ‘लोकमत’ने मंगळवारी सकाळी जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यावर अनेकांनी हे सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही अशीच प्रतिक्रिया दिली अन् झालेही तसेच. दुपारनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वीच पदाचा राजीनामा दिला.
देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी अचानकपणे राजभवनात जाऊन शपथविधी घेतल्यानंतर देशभर पुढे काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी या सरकारला विश्वासदर्शक ठराव जिंकू देणार नाही असा चंग बांधला. सर्व आमदार एकत्रित केले आणि महाविकास आघाडीचेच सरकार येणार अशी घोषणा केली. दरम्यान, या दोघांच्या शपथविधीला न्यायालयात आव्हान दिले.
न्यायालयाने फडणवीस व अजितदादा यांना चोवीस तासांत विश्वासदर्शक ठराव घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे बुधवारी या सरकारला विधीमंडळात विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार होते. हे सरकार टिकणार का याबाबत सोलापूरकरांच्या भावना जाणून घेतल्या. बहुतेकांनी हे सरकार टिकणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली अन् झालेही तसेच. विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याऐवजी या दोघांनी राजीनामा दिला.
फडणवीस, अजितदादा सरकार टिकले तर गरिबांची कामे होतील. भाजप सरकारने पाच वर्षांत रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात केली. सरकारी कार्यालयात शिस्त आणली. त्यामुळे हे सरकार बहुमत सिद्ध करेल व सहा महिने तरी टिकेल असे वाटते़
- लुणावत
हे सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही. खरे तर महाराष्ट्रातील जनतेने कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेले नाही.सत्तेचा जो लपंडाव सुरू आहे, खिचडी सरकार फार काळ टिकणार नाही. त्यामुळे जनादेशाचा आदर करून लागू केलेली राष्ट्रपती राजवट कायम ठेवावी.
- गौतम फडतरे
फडणवीस सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही. हे सरकार शेतकरी विरोधी होते़ त्यामुळे जनतेने त्यांना त्यांची जागा दाखविली आहे. हे दोघेही जाणार व महाविकास आघाडीचे सरकार येणार. शिवसेनेचाच विधानसभेवर भगवा फडकविणार असा मला विश्वास वाटतो.
-विकास सूर्यवंशी
राज्यात सध्या त्रांगडी स्थिती आहे. कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्याने दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. त्यामुळे हे सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही. आता थोड्या वेळानंतर एक वेगळीच बातमी येईल अशी स्थिती आहे. त्यामुळे निश्चित काहीच सांगता येत नाही.
- अॅड. राम कदम
भाजपने अवैधपणे अजित पवार यांना हाताशी धरून अचानकपणे शपथविधी करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला,पण त्यांचा आनंद फार काळ टिकणार नाही.विधीमंडळात हे सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही. राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार.
- तन्मय कदम