प्रवीण दरेकर हे शुक्रवारी पंढरपूर दौऱ्यावर आले होते. दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे दरेकर म्हणाले, राज्यपालांना विमान परवानगी नाकारणे हा पोरखेळ आहे. घटनात्मक पदाचा हा अपमान आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे गेलेली परवानगीची फाइल मुद्दाम बाजूला ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. सत्ताधारी तीन पक्षांची एकाच विषयावर तीन वेगवेगळी विधाने असतात. मतपत्रिकेवर मतदान घेण्यावरून हे पुढे आले आहे. भाजप सोडून कोणीही जाणार नाही. असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आपले कार्यकर्ते सरपंच व्हावे यासाठी सरपंच आरक्षण सोडत निवडणुकीनंतर घेतली, हे चुकीचे आहे. सरकारने शेतकऱ्यांची वीज तोडण्यास सुरुवात केली आहे. याविरोधात आम्ही रान पेटवू. सरकारला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही. पुण्यातील तरुणी पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणाची सत्यता पुढे आली पाहिजे, अशी मागणीही दरेकर यांनी केली.
----
उपमुख्यमंत्र्यांचा सत्तेसोबत स्नेह
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा स्नेह कायमच सत्ते सोबत असतो. त्यांनी भाजपची साथ सोडल्यानंतर हे सिद्ध झाल्याची टीका करताना त्यांनी साखर कारखान्यांना दिलेल्या थकहमीची चौकशी व्हावी, असेही प्रवीण दरेकर म्हटले.
----
पडळकरांची भावना महत्त्वाची
राज्यात यापूर्वी अनेक कामांची, स्मारकांची उद्घाटने झाली, मात्र कधी गुन्हा दाखल झाला नाही. आमदार पडळकारांनी अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याचे अनावरण करताच त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल झाला. कायदा सर्वांना सारखा आहे. आमदार पडळकारांची यामागची भावना महत्त्वाची असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.