कुर्डूवाडी : १९८० पासून मराठ्यांना कोणीही न्याय दिला नाही. मग ते आरक्षण असो किंवा शासकीय योजना असोत. याबाबत भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला आहे. स्वत:ची पक्षनिष्ठा ही माथाडी कामगार म्हणून आहे. त्यामुळे कोणीही माझ्या पक्षनिष्ठेवर बोलू नये, उलट त्यांच्या पक्षाने मराठ्यांच्या कोणत्या प्रश्नांवर किती काम केले आहे हे जाहीर सभेत सांगावे असे प्रतिपादन कुर्डूवाडी येथील कार्यक्रमात माजी मंत्री, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.
कुर्डूवाडी येथील पंचायत समितीच्या सभागृहात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जिल्हास्तरीय मराठा आरक्षणाबाबत सद्यस्थिती, मार्गदर्शन व गुणवंत पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढारे, करमाळ्याचे आ. संजयमामा शिंदे, विलासराव घुमरे, अमोलराजे भोसले, जिल्हाध्यक्ष संदीप भोरे, जिल्हा उपाध्यक्ष संजय यादव, सिनेट सदस्य डॉ. सचिन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील गुणवान १३ व्यक्तींचा येथे सन्मान करण्यात आला.
यावेळी मराठा महासंघाचे अध्यक्ष पवार म्हणाले, मराठा समाज म्हणजे एक समाज नाही. तो सर्व जाती समूहांचा समाज आहे. त्यामुळे आरक्षणाचा लढा हा यशस्वीपणे लढला जावा. त्यात सरकारने किंवा विरोधकांनी राजकारण करू नये. हा लढा न्यायालयायीन झाला असून तो सगळ्यांंनी लढला पाहिजे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष धनाजी गोडसे, पंचायत समिती सदस्य सुरेश बागल, शुभम दास, आनंद गोडगे, विकास म्हमाणे, विठ्ठल कदम, शिवराज गोडसे, अमोल गोडसे, साईनाथ गोडसे, जयंत भोरे, सुधीर सोमासे, माउली पवार, संतोष ननवटे, सूरज भोसले, किरण व्यवहारे, वासू जाधव, प्रथमेश शिंदे, अजित चोपडे यांनी परिश्रम घेतले आहे.
..............
फोटो : ०९ कुर्डूवाडी मराठा महासंघ
मराठा महासंघाच्या मेळाव्यात समाजातील गुणवंतांचा सत्कार करताना राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पवार, आ. नरेंद्र पाटील, राजेंद्र कोंढारे, जिल्हाध्यक्ष संदीप भोरे.