सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला भरभराटीचे दिवस आले ते आमदार बबनराव शिंदे यांच्या कारकिर्दीत. ते चेअरमन असताना व त्यानंतर दूध संघाने अनेक ठिकाणी स्थावर मालमत्ता घेतल्या आहेत. या स्थावर मालमत्तेवर विविध प्रकल्प उभारले आहेत; मात्र गेल्या १०-१५ वर्षांत नव्याने काही खरेदी केले तर नाही उलट आहे त्या विक्री कराव्या लागत आहेत. यापैकीच शेटफळ येथील पाच एकर शेतजमीन. मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथे सोलापूर- पुणे हायवेलगत २००१ मध्ये ५ एकर २ गुंठे शेतजमीन दूध संघाने खरेदी केली होती. ही शेतजमीन आतापर्यंत दूध संघाचे माजी उपाध्यक्ष मनोहर डोंगरे यांच्या ताब्यात आहे. शेतजमिनीचा ताबा घेण्यासाठी प्रशासक प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यासाठी अडथळे येत आहेत.
जमीन मोजणी करुन ताबा घेण्यासाठी प्रशासकीय मंडळाचा प्रयत्न आहे. त्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाला अतितातडीच्या मोजणीसाठी १८ हजार रुपये भरले आहेत. अतितातडीच्या मोजणीसाठी तारीख देण्यात आली. दूध संघाचे कर्मचारी मोजणीसाठी जाऊन थांबले; मात्र भूमी अभिलेख कार्यालयाचा मोजणीदार आलाच नाही. त्यामुळे मोजणी झाली नाही व जमीनही ताब्यात मिळाली नाही.
---
मोजणीदाराची चकवाचकवी
अतितातडीच्या मोजणीसाठी १८ हजार रुपये भरुन घेणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयाने १० ऑगस्टनंतर २० ऑगस्ट ही मोजणीची तारीख दिली. मात्र मोजणीसाठी कर्मचारीच आला नाही. आता ३० ऑगस्ट रोजी मोजणीची तारीख दिली आहे. भूमी अभिलेख कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ३० ऑगस्ट रोजी मोजणीदार नक्की येईल असे म्हटल्याचे सांगण्यात आले. रेडिरेकनरनुसार या पाच एकर क्षेत्राची किंमत एक कोटी ३३ लाख रुपये आहे. बाजारभाव त्यापेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आले. संचालक मंडळाने या जमिनीवर एक कोटी रुपये कर्ज काढले आहे.
----
२२ कर्मचाऱ्यांचे राजीनामे
दूध संघाच्या ७६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी २२ कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले तर नव्याने तिघांचे राजीनामे आले आहेत. चार कर्मचारी सेवानिवृत्त तर एकाचा मृत्यू झाला. २३ कर्मचारी हजर झाले. १० कर्मचारी गैरहजर तर १३ कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती केली आहे.
----