मंगळवेढा : नदीकाठची पूर परिस्थिती या शासनाला हाताळता आली नाही. हवामान खात्याने आगावू सूचना देवून सुद्धा झालेले प्रचंड नुकसान होण्याअगोदर पाण्याचा प्रवाह सोडून थांबवता आले असते. आता सर्व नुकसानग्रस्ताना लवकर सर्वेक्षण करून सरकारने तातडीने मदत द्यावी. पूरग्रस्तांना केंद्र सरकारकडून मदत मिळवून देणार असल्याची ग्वाही खा. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी दिली.
खा.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी पूरग्रस्त व अतिवृष्टीने बाधित झालेल्या ब्रह्मपुरी, बठाण, उचेठाण, रहाटेवाडी व तामदर्डी या भागातील शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली यावेळी त्यांच्यासमवेत माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण, तालुकाध्यक्ष संतोष मोगले, राजेंद्र सुरवसे, शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकुल, तहसीलदार स्वप्निल रावडे, भारत पाटील, राजेंद्र पाटील, सिद्धेश्वर कोकरे, सुरेश जोशी, प्रसाद पवार आदीसह पूरग्रस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
खा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य म्हणाले की पंतप्रधान सडक योजनेतील मंजूर असलेल्या रहाटेवाडी पुलाच्या रखडलेल्या कामासाठी सुधारित दराप्रमाणे केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी मिळवून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार. तसेच केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या दौऱ्यात ब्रह्मपुरीत कोकरे यांच्या शेतातील पुरामुळे जळून गेलेल्या कांद्याची भरपाई द्यावी. संजय पाटील यांची गाय दगावली व घरासह धान्याचे झालेले नुकसान भरपाई देण्यासाठी तहसीलदारांना सर्व पंचनामे त्वरित करून भरपाई द्यावी अश्या सूचना दिल्या. उचेठाण व बठाण येथील दोन्ही बंधारे बाजूने खचले असून ते कायम स्वरूपी सीमेंट मजबूत करून देण्याची मागणी केल्यावर संबधीत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच रहाटेवाडी येथील बाधीत क्षेत्राची पाहणी केली.