पंढरपूर : येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठ्ठल दर्शनासाठी आॅनलाईन बनावट पास वापरण्याचा प्रयत्न करणार्या पाच भाविकांना मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली व सुरक्षा कर्मचार्यांनी रंगेहाथ पकडले आहे. या भाविकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना रविवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीतर्फे भाविकांच्या सुविधेकरिता व कमीत कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन होण्यासाठी आॅनलाईन दर्शन सुविधा दोन वर्षांपासून सुरु केली आहे. या सुविधेचा लाभ अडीच ते तीन लाख भाविकांनी घेतला आहे. आॅनलाईन दर्शनाच्या पासमुळे ठराविक आणि कमीत कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन होत आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून मंदिरामध्ये आॅनलाईन दर्शनासाठी येणारे भाविक एकाच नावाचे दोन पास किंवा पासमध्ये काही तरी हेराफेरी करुन पास तयार करुन आणत असल्याचे मंदिर समितीच्या कर्मचार्यांच्या निदर्शनास आले. विठ्ठल मंदिरात रविवारी सकाळी ७ च्या सुमारास कचरु मारुती भोसले (६०, रा. खरपोडी, ता. खेड, जि. पुणे) या नावाचे दोन पासधारक विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनासाठी आल्याचे मंदिर समितीचे सुरक्षा कर्मचारी चंद्रकांत कोळी यांच्या निदर्शनास आले. याविषयी जादा चौकशी केल्यानंतर अरविंद विठ्ठल काशीद (२६, रा. खरपोडी, ता. खेड, जि. पुणे), गोपाळ तुकाराम गरुड (५२, रा. खरपोडी, ता. खेड, जि. पुणे), किसन गणपत अरगिज (रा. ठाणे), सदाशिव नाना मांजरे (रा. मांजरेवाडी, ता. खेड, जि. पुणे) या भाविकांनी विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्यासाठी बोगस पास आणल्याचे निदर्शनास आले. याबाबत पोलिसांत तक्रार केल्यानंतर पाचही भाविकांना तपासासाठी ताब्यात घेण्यात आले. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. आर. थोरात करीत आहेत.
------------------
विठ्ठलाच्या दर्शनाचा थोडा वेळ वाचविण्यासाठी भाविकांनी आॅनलाईन पासमध्ये फेरफार करु नये. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. - संजय तेली, कार्यकारी अधिकारी, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती