सोलापूर : डॉक्टरांची बनावट सही करुन कागदपत्रे सादर करून मुख्यमंत्री निधीतून आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष यतीन शहा यांच्यासह दोघांविरुध्द गुन्हे नोंदविण्यात आले. हा प्रकार २३ आॅगस्ट २०१५ ते १ डिसेंबर २०१५ यादरम्यान अश्विनी सहकारी रुग्णालय, सोलापूर येथे घडला.
पोलीस उपनिरीक्षक अजय हंचाटे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष यतीन विजयकुमार शहा (वय ३७, रा. भंडारकवठे), अप्पासाहेब कल्लप्पा बगले (वय ५३) व अश्विनी सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्र या रुग्णालयातील अभिलेख हाताळणारे अज्ञात अधिकारी व कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
मुख्यमंत्री सहायता निधी कक्षात वैद्यकीय अर्थसहाय्यासाठी प्राप्त झालेल्या अर्जांपैकी अश्विनी हॉस्पिटल, सोलापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या तीन प्रकरणांतील कागदपत्रे बनावट असल्याच्या संशयावरुन जिल्हाधिकारी सोलापूर यांच्यामार्फत पडताळणी करण्यात आली. त्यावेळी ती कागदपत्रे बनावट असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्या अहवालाच्या अनुषंगाने तिन्ही प्रकरणे कागदपत्रांसह वैद्यकीय अर्थसहाय्यासाठी आरोपी यतीन शहा यांची चौकशी करुन पुढील कारवाई करावी, असे निर्देश आहेत. असा आदेशपत्रात उल्लेख असून, पत्रासोबत अर्जदार व्यंकट शिवाजी शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना अग्रेषित करुन सहायता निधीतून आर्थिक मदत मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जासोबत डॉ. गुरुनाथ परळे कार्डिओलॉजिस्ट यांचे ४० हजार रुपयांचे इस्टिमेट, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, रेशनकार्ड तसेच रुग्ण नामे, अप्पासाहेब कल्लप्पा बगले यांना सदर निधी मिळावा म्हणून यतीन शहा यांचे शिफारस पत्र, डॉ.अनुपम शहा कार्डीओलॉजिस्ट यांचे १ लाख ८० हजार रुपयांचे इस्टिमेट व तसेच रुग्ण नामे प्रकाश मारुती कासार यांच्यासाठी तशीच कागदपत्रे दाखल करुन २ लाख १० हजार रुपयांचे इस्टिमेट कागदपत्रे होती. या प्रकरणाची तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त जोशी यांनी चौकशी करुन अहवाल पोलीस आयुक्त यांच्याकडे सादर केला होता. त्यावर तत्कालीन पोलीस आयुक्तांनी ते प्रकरण फेरचौकशीसाठी पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) यांच्याकडे दिले.
पोलीस उपायुक्तांनी केली चौकशी- पोलीस उपायुक्त अपर्णा गीते यांनी या प्रकरणी रुग्ण आशा राजू सूर्यवंशी, अप्पासाहेब कल्लप्पा बगले, प्रकाश मारुती कासार व इस्टिमेट देणारे डॉक्टर गुरुनाथ पुरुषोत्तम परळे, डॉ. अनुपम अरविंद शहा, शिफारस पत्र देणारे यतीन शहा, अंदाजित इस्टिमेट हाताळणारे अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन कें द्र चौकशी करुन माहिती घेतली असता त्यांना शस्त्रक्रियेसाठी कोणताही निधी मिळाला नसल्याचे सांगितले तर रुग्णांनी स्वखर्चानेच शस्त्रक्रिया केल्याची माहिती समोर आली.
बनावट सही केली म्हणणे- याच प्रकरणात डॉ. अनुपम शहा व डॉ. गुरुनाथ परळे यांची चौकशी केली असता आजारावरील अंदाजित येणाºया खर्चाचे इस्टिमेट दाखविले असता डॉ. परळे यांनी रुग्ण आशा सूर्यवंशी व प्रकाश कासार यांनी दिलेल्या इस्टिमेटवरील सह्या या आपल्याच असून, यात नमूद केलेली अंदाजित रक्कम बरोबर असल्याचे जबाबात सांगितले तर डॉ. अनुपम शहा यांना अप्पासाहेब बगले यांना त्यांच्या आजारासंदर्भात दिलेले इस्टिमेट दाखवले असता त्यांनी इस्टिमेट बनावट असून, त्यावरील सही नसल्याचे सांगितले.