दोर निर्मिती कारखान्यात काम मिळाल्याने आधार
बार्शी टेक्स्टाइल मिलमध्ये गेल्या १३ वर्षांपासून काम करत होतो. अचानक काम थांबले. दरमहा केवळ चार हजार रुपये हाती येऊ लागले, तेव्हा कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चांडक कारखान्यात दोर वळण्याच्या कामावर जाऊ लागलो. तेथे मिळाल्या तुटपुंज्या रोजगारावर तूर्तास तरी उपजीविकेचा प्रश्न मिटला आहे, असे नागनाथ गोसावी यांनी सांगितले.
...अन् फाइल बनवू लागलो
बार्शी टेक्सटाइल मिलमध्ये सलग २१ वर्षे कामगार म्हणून काम करत आहे. लॉकडाऊनमध्ये मिल बंद झाली, पुढे कधी सुरू होईल, याची शाश्वती नव्हती. कुटुंबातील सहा जणांची जबाबदारी माझ्यावरच होती. त्यामुळे पर्यायी नोकरी शोधणे गरजेचे होते. दोन - तीन ठिकाणी कामे मिळाली; परंतु तेथे सुर जुळले नाही. अखेर फाइल बनविण्याच्या कारखान्यात काम मिळाले आणि कसेबसे कुटुंब चालवत आहे, असे प्रसाद पवार यांनी सांगितले.
मिल लवकर सुरू होण्याची अपेक्षा
बार्शी मिलमध्ये गेली ३५ वर्षे काम करीत आहे. लॉकडाऊननंतर मिल बंद पडली. मला तीन मुले असल्यामुळे उदरनिर्वाहासाठी दुसरी नोकरी शोधली नाही. शिवाय तसेच डोळ्याच्या अधुपणामुळे नवीन काम मिळणे शक्य नव्हते. मात्र, एक कामगार नेता म्हणून सर्व कामगारांना मी माझे कुटुंबीय समजतो. त्यामुळे ही मिल लवकर सुरू व्हावी, अशी अपेक्षा आहे, असे इंटकचे जनरल सेक्रेटरी नागनाथ सोनवणे यांनी सांगितले.
मसाल्याच्या कारखान्यात काम सुरू
गेल्या १० वर्षे मी या मिलमध्ये काम करीत आहे. लॉकडाऊननंतर निम्माच पगार मिळू लागला; परंतु पतीला संधीवाताचा आणि डायबिटीसचा त्रास असल्यामुळे औषधाचा खर्च होताच. तसेच घरखर्चामुळे पैसे शिल्लक राहत नव्हते. त्यामुळे मसाल्याच्या कारखान्यामध्ये काम करावे लागत आहे. पैशाअभावी मुलाची पोलीस अकॅडमी बंद करावी लागल्याचे संजीवनी कुंभार यांनी सांगितले.