सोलापूर : शहरात 97 हजार घरगुती आणि 1177 सार्वजनिक मंडळाची प्रतिष्ठापना झाली असून लष्कर मध्यवर्तीच्या लोधी समाज मानाचा जय तिरुपती गणपतीच्या मिरवणुकीने सोलापुरात विसर्जनाला सुरुवात झाली. पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्या हस्ते पूजा करून टाळ मृदंगाच्या गजरात आणि ढोल ताशाच्या निनादात मिरवणुकीला सकाळी 8.30 सुरुवात झाली. यावेळी मध्यवर्तीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पारसवार, देवेंद्र भंडारे, अब्राहम कुमार, लक्ष्मणसिंग बॉम्बेवाले, भारत परळकर, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहाय्यक आयुक्त मोरे यांच्या उपस्थितीत मिरवणुकीला सुरुवात झाली.
सोलापूर शहरात आठ मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ असून त्यापैकी लष्कर मध्यवर्ती हे एक आहे. या लष्कर मध्यवर्ती अंतर्गत सार्वजनिक 124 मंडळ असून दिवसभरात या मंडळांच्या विसर्जन मिरवणुका निघत आहेत. लष्कर मध्यवर्तीच्या तिरुपती गणपतीच्या पालखीत चांदीचा 'श्री' लक्ष वेधून घेत राहिला. या पालखीच्या पुढे टाळ मृदुंगातील वारकरी, त्यापुढे झांज टिपरी आणि ढोल ताशांचा दणदणाट झाला. नळबाजारातून मुर्गी नाला मार्गे वाजत गाजत मिरवणूक निघाली. कुंभार वेस, मौलाली चौक, जगदंबा चौक मार्गे सात रस्ता येथून विजापूर रोड वरील छत्रपती संभाजी महाराज तलावात विसर्जनासाठी मार्गस्थ होत आहेत. सात रस्ता चौकात मध्यवर्ती च्या वतीने सर्व मंडळाच्या मिरवणुकांचे स्वागत केले जात आहे.