सोलापूर : दुय्यम निबंधक कार्यालय वर्ग २ सोलापूर उत्तर येथील कार्यालयात दोन तोतया व्यक्तींना उभे करून खोटे व बनावट खरेदीखत करत शेतजमीन विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चौघांविरोधात सदर बझार पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्तात्रय गुलाब मोरे (वय ६२, रा. गणेशनगर, मडकी वस्ती, नागोबा मंदिरामागे, पुणे रोड, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मारूती रत्नप्पा पवार (रा. बीबीदारफळ, ता. उ. सोलापूर), अशोक गुलाब मोरे, श्रीकांत नागनाथ मोरे, सुनील दत्तात्रय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी दत्तात्रय मोरे व मुलगा विकास यांनी तलाठी कार्यालयातून सातबारा व तहसील कार्यालयातून फेरफार काढले होते. तेव्हा त्यांना खरेदी दस्त २१९३/२००३ बीबीदारफळ येथील फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ शहाजी व अशोक यांचे मालकीची शेजजमीन आहे.
मारूती पवार याने फिर्यादी दत्तात्रय मोरे, फिर्यादीचा मुलगा व बेपत्ता झालेला भाऊ शहाजी मोरे यांच्याऐवजी दोन तोतया व्यक्तींना उभे करून अशोक मोरे याच्याशी संगनमत करून ३ जुलै २००३ रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात खोटे व बनावट खरेदीखत करून स्वत:च्या नावे करून घेतली. या खरेदीवेळी फिर्यादीऐवजी दोन तोतया व्यक्ती उभ्या केल्याचे उघड झाले आहे. बनावट खरेदी दस्ताच्या आधारे शेतजमीन विकली आहे. या घटनेची नोंद सदर बझार पोलिस ठाण्यात झाली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक लोंढे हे करत आहेत.