- नारायण चव्हाण (सोलापूर)
वर्षानुवर्षे जिराईत शेतीत राबणाऱ्या माळकावठे (जि. सोलापूर) येथील शेतकऱ्यांमध्ये सोलापूर अॅग्रो प्रोड्युसर कंपनीने आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. विविध कृषिविषयक योजना राबवून कंपनीने माळकवठे गावाचा संपूर्ण चेहरामोहरा बदलून टाकला आहे .
तीन वर्षांपूर्वी हणमंत कुलकर्णी यांनी सोलापूर अॅग्रो प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली. कृषी विभागाकडे तिची नोंदणी केली. निव्वळ शेतीवर अवलंबून असलेल्या तरुणांना एकत्र करीत त्यांनी शेतविकासाचा ध्यास घेतला. गावातील अनेकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले; परंतु कुलकर्णी यांनी नियोजनपूर्वक काम करीत माळकवठ्याच्या शेतविकासाचा आराखडा तयार करून कृषिविभागाकडे सादर केला. त्यासाठी त्यांनी सोलापूर च्या ‘आत्मा ' चे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे यांची मदत घेतली. पहिल्याच वर्षी त्यांनी ७०० शेतकरी सभासद केले.
कृषिविभागाने सोलापूर अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या कृषी विकास आराखड्याला मान्यता दिली. स्प्रींकलर संच, शेततळी, पाईपलाईन, पाणबुडी मोटारी, शेततळ्यासाठी प्लास्टिक आच्छादन, ताडपत्री, कृषी औजारे, ट्रॅक्टर, बी बियाणे आदींचे अनुदानावर वाटप केले. शेतीला सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे भकास माळकवठे गावचे रूप हळूहळू पालटू लागले.
आता या गावात शेतकरी कंपनीच्या माध्यमातून अनेकविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. दाळमिलची उभारणी करण्यात आली आहे. त्यासाठी डाळीची प्रतवारी करणारी मशीन घेतली. परिसरातील शेतकऱ्यांना तूर, हरभरा यांपासून डाळ करण्याची सोय झाल्याने त्यांना मोठा आर्थिक लाभ होत आहे. कंपनीची आर्थिक उलाढाल आणि विश्वासार्हता वाढत राहिल्याने शासनाकडून तूर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. पहिल्याच वर्षी दक्षिण सोलापूर तालुक्यातील १६०० शेतक ऱ्यांनी या हमीभाव खरेदी केंद्रात तूर विक्रीसाठी आणली. त्यांची पायपीट वाचली शिवाय चांगला दर मिळाला. शेतमालाच्या साठवणुकीसाठी गोदाम बांधण्याची मागणी शेतकऱ्यांतून पुढे आली. आता कंपनीच्या मालकीचे प्रशस्त गोदाम आहे. व्यवस्थापन उत्तम असल्याने शेतकऱ्यांना कशाचीच चिंता नाही.
दरवर्षी एकाच पिकाची निवड करून गावातील सर्व शेतकरी सभासद त्याच पिकाची लागवड करतात. कंपनीच्या वतीने त्यांना बी-बियाणे पुरवले जातात. त्याची निगा, रोगव्यवस्थापन, कीड व्यवस्थापन यावर कृषितज्ज्ञांचा बांधावर सल्ला दिला जातो. अधिक उत्पादनासाठी अभ्यास सहलीतून मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केला जातो. काढणीनंतर शेतमालाची विक्रीव्यवस्था कंपनीकडून केली जाते. मुंबई, पुणे, बंगळुरू येथे हा शेतमाल पाठवला जात असल्याने त्याला दरही चांगला मिळतो. ही शेतकरी उत्पादक कंपनी माळकवठे गावातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे.