सोलापूर: जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने विक्रमी म्हणजे ५९ हजार ९१८ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली असून, गेल्या आठवडाभरातील अतिपावसाने पाने पिवळी पडू लागल्याने शेतकºयांतून चिंता व्यक्त केली जात आहे. अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे निर्माण झालेली क्लोरोसिसची ही लक्षणे असून, शेतकºयांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
जिल्ह्यात खरिपाचे २ लाख ३४ हजार ६४१ हेक्टर क्षेत्र आहे. सर्वच नक्षत्राच्या पावसाने गेल्या दहा वर्षांत प्रथमच समाधानकारक हजेरी लावल्याने १४६ टक्के क्षेत्रावर (३ लाख ४२ हजार ३९४ हेक्टर) खरिपाची पेरणी झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने उडीद, तूर आणि सोयाबीनच्या पेरणीला शेतकºयांनी महत्त्व दिल्याचे दिसून येत आहे. अक्कलकोट, करमाळा, उत्तर सोलापूर, बार्शी, मोहोळ तालुक्यात बºयाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने पिकात पाणी साचले आहे. त्यामुळे जोमात आलेली पिके कोमात जाण्याची भीती शेतकºयांना वाटू लागली आहे.
सोयाबीनला बसू शकतो फटकाजिल्ह्यात सोयाबीनचा पेरा प्रथमच मोठ्या प्रमाणावर करण्यात आला आहे. अति पावसाने सोयाबीनची पाणे पिवळी पडत आहेत. याच्या कारणांबाबत माहिती देताना कृषी विज्ञान केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे म्हणाले, लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या झाडामध्ये क्लोरोसिसची लक्षणे निर्माण होतात. क्लोरोसिस ही एक शारीरिक विकृती आहे. लक्षणे: लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता सर्वप्रथम कोवळ्या पानांवर दिसून येते.
हरितद्रव्याच्या अभावामुळे पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो आणि शिरा फक्त हिरव्या दिसतात. सोयाबीनचे प्रथम ट्रायफोलिएट पाने हिरवी राहतात कारण लोह हे अन्नद्रव्य अचल (वाहू न शकणारे) आहे. लोह रोपट्यात स्थिर होऊन साठविली जाते. म्हणूनच, नवीन पानांमध्ये लक्षणे दर्शविली जातात. पाने पिवळी पडल्यामुळे हरीतद्रव्य कमी होऊन प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते, वाढ खुंटते आणि उत्पादनही कमी येते.
शेतात साचलले पाणी सोडाशेतकºयांनी याबाबत चिंता न करता वाफसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात साचलेले पाणी बाहेर काढून द्यावे, असे आवाहन कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार यांनी केले आहे. गरज असेल तर ०.५ ते १.० टक्के फेरस सल्फेट किंवा ईडीटीए चेलेटेड मिक्स मायक्रोन्यूटिएंट ग्रेड ५०० ग्रॅम प्रती १०० लिटर पाण्यात मिसळून पानावर फवारावे.