माढा : सीना-माढा बोगद्यातून केवळ २०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आलेले आहे. हे पाणी सर्वदूर पोहोचू शकत नाही. त्यामुळे ९०० क्युसेक्सने पाणी सोडण्याच्या मागणीसाठी माढा व मोहोळ तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. याबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकार्यांकडे धाव घेतली असून, योग्य ती कार्यवाही न केल्यास रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सीना-माढा जोडकालव्यातून सोडण्यात आलेले पाणी माढा तालुक्यातील खैराव व मोहोळ तालुक्यातील बोफले बंधार्यापर्यंत व बंधारा भरल्यानंतर अनगर, पासलेवाडी, वाफळे, खैराव, अंजनगाव (खे.), कुंभेज, लोंढेवाडी, गोरेवाडी, मानेगाव, बुद्रुकवाडी, वाकाव, लोंढेवाडी, उपळाई खुर्द, विठ्ठलवाडी, खैरेवाडी, चव्हाणवाडी आदी गावातील नागरिकांनी केलेल्या पाईपलाईनमुळे पिकांना जीवदान मिळत आहे. जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडेही १२ मे रोजी शेतकर्यांनी जोडकालव्यातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. मात्र त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे २८ मे रोजी सीना काठावरील शेतकरी अंजनगाव (खे.) येथील एस. टी. स्टॅण्डसमोर सकाळी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकर्यांनी दिला आहे. या निवेदनावर माजी सरपंच भागवत चौगुले, माजी सरपंच चंद्रकांत व्हनमाने, बापूसाहेब वाघमोडे, समाधान पाटेकर, महादेव गोरे, दशरथ पाटेकर, बिभीषण सुतार, विजय मोहिते, राजेंद्र वाघमोडे, रवींद्र वाघमोडे, राजकुमार व्हनमाने आदींच्या सह्या आहेत.
---------------------------------------
शेतकर्यांचे शिष्टमंडळ
सध्या जोडकालव्यातून केवळ २०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्याने हे पाणी या बंधार्यापर्यंतही पोहोचू शकत नाही. त्यामुळे ९०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले तर त्याचा फायदा शेतकर्यांना व जनावरांना पिण्यासाठी होणार आहे. याबाबत या परिसरातील नागरिकांनी तहसीलदार रमेश शेंडगे यांची भेट घेऊन सोमवारी निवेदन दिले आहे.
------------------------
बेमुदत उपोषण...
माढा तालुक्यातील निमगाव (मा.) येथील बंधारा भरुन देण्याच्या मागणीसाठी पंचायत समितीचे माजी सदस्य बापूसाहेब जाधव व माजी सरपंच अशोक कदम यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथील सिंचन भवनसमोर तीन दिवस उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी पाणी सोडण्याचे आश्वासन देण्यात आले होते.