उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने शेती पिकाला पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. ही संधी साधून शेतीपंपाच्या थकीत वीज बिलासाठी वीज वितरण कंपनीने मागील ४ दिवसांपासून कोणतीही पूर्वकल्पना न देता तीन तास वीज कपात करण्याचा घाट घातला. या प्रकारामुळे पिके वाया जातात की काय, ही धास्ती शेतकऱ्यांनी लागली होती. यामुळे करकंब येथील जवळपास १५० शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीचे कार्यालय गाठले अन् कनिष्ठ अभियंता माने यांना याबाबत जाब विचारला. शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका पाहून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देऊन लागलीच वीजपुरवठा सुरू केला.
यावेळी उपसरपंच आदिनाथ देशमुख, ॲड. शरद पांढरे, प्रा. सतीश देशमुख, राहुल शिंगटे, पोपट धायगुडे, भीमराव शिंदे, शिवाजी व्यवहारे, सावता खारे, लक्ष्मण नलवडे, रघुनाथ पांढरे, महेश देशमुख, अशोक जाधव, शंकर राऊत, नामदेव काकडे, शहाजी धोत्रे आदी उपस्थित होते.