सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दर रविवारी भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात खरेदी-विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आठवडे बाजार आणि जनावरांचे बाजार बंद केले होते. काही महिन्यांनंतर जनावरांचा बाजार सुरू केला. मात्र पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जनावरांचा बाजार बंद असल्याने खरेदीदार व्यापारी, शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यामुळे जनावरांची खरेदी-विक्री करण्यास अडचणी येत आहेत.
जनावरांच्या खरेदी-विक्रीनिमित्त पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश या राज्यांतूनही व्यापारी, शेतकरी येण्याचे पूर्णपणे थांबले आहे. जनावरांचा बाजार बंदचा सर्वांत मोठा फटका शेतकऱ्यांबरोबरच हातावर पोट असणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना बसला आहे. गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्यांचे खरेदी-विक्री व्यवहार थांबल्याने व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांचीही आर्थिक कोंडी झाली आहे.
लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले
कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे लॉकडाऊनच्या काळात रोज लाखो रुपयांचे उत्पन्न (सेस) बुडाले आहे. जनावरांचा बाजार बंद असल्याने बाजार समितीच्या आवारात काम करणारे हमाल, तोलार, कामगार, हॉटेल व्यावसायिक, वाहनचालक, अडत व्यापारी यांनाही मोठा आर्थिक फटका बसला असल्याचे सभापती गिरीश गंगथडे यांनी सांगितले.