सोलापूर : शेतकऱ्यांनो पीक चांगले येण्यासाठी तुम्ही बियाणे, कीटकनाशक व रासायनिक खताचा वापर करीत असाल तर सावधान. या सर्व गोष्टी प्रमाणित असल्याची खातरजमा करा, अन्यथा बोगस उत्पादन माथी मारून विक्रेतेच मालामाल होत असल्याचे कृषी खात्याच्या कारवाईवरून दिसून आले आहे.
शेतीमध्ये विक्रमी पिकाचे उत्पादन घेण्यासाठी आता शेतकरी बंधूमध्ये स्पर्धा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. यासाठी बाजारात मिळणारे बियाणे, रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर करताना दिसून येत आहेत. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन बोगस बियाणे, खते व कीटकनाशके बाजारात आणणारे एजंट सक्रिय झाल्याचे गेल्या वर्षभरात झालेल्या कारवायावरून दिसून आले आहे. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यावर अनेक कंपन्या बंद होत्या. याचा फायदा घेत कोल्हापुरातील एजंटांनी तामिळनाडूतील बोगस खत बाजारात आणल्याचे उघडकीला आले होते. टेंभुर्णी व मोहोळ येथे झालेल्या कारवाईत ही बाब उघड झाली होती.
तसेच खरिपाच्या पेरणीवेळेस सोयाबीनच्या बियाणाला मागणी वाढली होती. या काळात बोगस बियाणांचा पुरवठा झाला. बार्शीत तालुक्यात अनेक ठिकाणी सोयाबीनची उगवण झाली नसल्याची तक्रार आल्यावर कृषी विभागाने तपासणी करून संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे. सध्या रब्बीची पेरणी अंतिम टप्प्यात आहे. गहू, हरभरा बियाणाची खरेदी करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.
चार गुन्हे दाखल
गेल्या वर्षभरात अप्रमाणित खते व बियाणे विक्रीस आणणाऱ्या ४५ जणांना नोटिसा देण्यात आल्या तर ४ जणांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. बियाणे अप्रमाणित पुरविणाऱ्या १३ कंपन्याविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत तर दोघांचा बियाणे परवाना निलंबित करण्यात आला आहे.
द्रवरूप खताबाबत सावधान
कृषी विभागाने खरीप व रब्बी हंगामावेळेस कृषी उत्पादन विक्रेते दुकानदारांची तपासणी मोहीम राबविली. यात सोयाबीन, तूर, हरभरा या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे या कीटकनाशकाला मागणी जास्त असते. विनापरवाना उत्पादित केलेले कीटकनाशक बाजारात येत आहे. त्याचबरोबर अलीकडे द्रवरूप खते बाजारात येत आहेत. असे ८० हजार किमतीचे १५० लिटर द्रवरूप खत कृषी विभागाने जप्त केले व संबंधितावर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
या वर्षभरात करण्यात आलेली कारवाई
- प्रकार बियाणे खते कीटकनाशके
- किती नमुने तपासले ७१२ ३९६ ३२५
- अप्रमाणित नमुने १७ ४५ ८
- नोटीस दिली १७ ४५ ८
- कोर्टात केसेस दाखल ३ २५ ७
- विक्री बंदचे आदेश ० ० ०
- जप्तीची संख्या-परवाने रद्द ० १ ०
शेतकऱ्यांनी खते व बियाणे घेताना खातरजमा करावी. अलीकडे द्रवरूप खताचा वापर वाढला आहे. यासाठी मोठी किमत शेतकऱ्यांना मोजावी लागते. सेंद्रीय आहे, कंपनीचे आहे असे सांगून एजंट लोक बोगस माल पुरवितात. यात शेतकऱ्यांची फसवणूक होते. बाजारात येणाऱ्या अशा गोष्टींवर शेतकऱ्यांची करडी नजर आहे.
सागर बारवकर, गुण नियंत्रण अधिकारी