सोलापूर : एसटी कर्मचाऱ्यांचा मागील अनेक दिवसांपासून संप सुरू आहे. या संपाला विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. त्यातच सोमवारी सोलापुरातील अनिल पाटील या शेतकऱ्याने एसटी कर्मचाऱ्यांना शासनात विलीनीकरन करावे, या मागणीसाठी सोलापूर ते तुळजापूरपर्यंत दंडवत घालून ते पूर्णही केले.
सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पाटील यांनी रुपाभवानी मातेचे दर्शन घेऊन या दंडवत प्रदक्षिणेला सुरुवात केली. मंगळवारी सकाळी न्ऊ वाजता त्यांनी दंडवत पूर्ण केले. यावेळी एसटीमधील कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, तुळजापूरजवळ पावसाने हजेरी मांडल्यामुळे मंगळवारी सकाळी ही प्रदक्षिणा पूर्ण झाली. एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू असल्याने राज्यभरातील एकही गाडी रस्त्यावर धावली नाही. यामुळे याचा मोठा परिणाम प्रवाशांवर होत आहे. पण, तरीही एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झालेली नाही. अनेकवेळा बैठका होऊनही योग्य तोडगा निघाला नसल्याने कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. यामुळे सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसत आहे.
आई तुळजाभवानी मातेने मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी द्यावी
मागील अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असूनही मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे पाहिलेले नाही. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना योग्य न्याय मिळालेला नाही. त्यांना योग्य न्याय मिळावा, यासाठी आपण आंदोलन करत असून आई तुळजाभवानी मातेने मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी द्यावी, असे मत अनिल पाटील यांनी व्यक्त केले.