आप्पासाहेब पाटील, सोलापूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतर्गंत पात्र शेतकरी कुटुंबास २००० रुपये प्रती हप्ता या प्रमाणे ६००० रुपये प्रती वर्षी लाभ देण्यात येतो. योजनेच्या १४ व्या हप्त्याचा लाभ मे अथवा जून २०२३ मध्ये जमा होणार आहे. हप्त्याच्या लाभासाठी बँक खाते आधारशी जोडणे बंधनकारक आहे. लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा गावातील पोस्ट कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
दरम्यान, लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाची जोडण्याची सुविधा त्यांच्याच गावातील पोस्ट ऑफिस मार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्राद्वारे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत आपल्या गावातील पोस्ट कर्मचाऱ्यांमार्फत खाते उघडावे. सदरचे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाची ४८ तासात जोडले जाईल. ही पध्दत अतिरिक्त कागदपत्राशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. बँक खाते सुरू करण्याची सुविधा आपल्याच गावातील पोस्ट कार्यालयात उपलब्ध असल्याने लाभार्थ्यांना इतरत्र जाण्याची गरज पडणार नाही.
दरम्यान, १ लाख ४१ हजार ३७० लाभार्थ्यांनी पीएम किसान खात्याची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांना १४ व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही. जिल्ह्यातील एकूण १ लाख ९२ हजार शेतकरी लाभार्थ्यांची बँक खाती त्यांच्या आधार क्रमांकाशी जोडलेली नाहीत. या योजनेच्या १४ व्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य केलेले असल्याने आयपीपीबीमार्फत १५ मे २०२३ पर्यंत गावपातळीवर सर्वत्र मोहीम राबविण्यात येत आहे.