मागील २० वर्षांपूर्वी शेतीमधील कामे करण्यासाठी बैलजोडीशिवाय पर्याय नव्हता. प्रत्येक शेतकऱ्यांच्या दावणीला जनावरे हमखास होती. परंतु जनावरांचे पालन-पोषण करणे श्रमाचे काम असल्याने जनावरे पाळण्याचा कल कमी झाला आहे. अशातच अलीकडील काळात आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे बैलाने शेती करणे दुरापास्त झाले आहे.
ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी व्यवसाय म्हणून गायी-म्हशींचे पालन करीत आहेत. परंतु लहान मोठ्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीमधील कामे होऊ लागल्याने बैलजोडी नामशेष होऊ लागली आहे. असे असताना नेमतवाडी येथील शेतकरी दत्तात्रय कोळी हे वयाच्या १५ व्या वर्षांपासून बैल हाकण्याचे काम करतात. बैलांचे योग्य संगोपन करण्याचा असलेला छंद ते आजही जोपासत आहेत. त्यांच्याकडे ५ ते ६ लाख रुपये किमतीच्या खोंडांचे पोषण केले जाते. ते बैलांवर मुलांप्रमाणे प्रेम करीत आहेत. याचा प्रत्यय ९ ऑगस्ट रोजी मुलगा शक्तिमान आणि बैल सुरत्या याचा दुसरा वाढदिवस एकत्र साजरा करून प्राण्यांवर प्रेम करणारा शेतकरी आजही असल्याचे दाखवून दिले. यावेळी बालाजी कोळी, पप्पू गोसावी, पांडुरंग अमराळे, अमोल अमराळे, ज्योतिराम अमराळे, महेश शेळके, रणजित पाटील, ब्रह्मदेव अमराळे आदी उपस्थित होते.