सोलापूर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले उजनी धरणाचे पाणी अखेर एकरुख उपसा सिंचन योजनेद्वारे दर्गनहळ्ळी आणि रामपूर तलावापर्यंत पोहोचले. यानिमित्ताने शेतकऱ्यांनी जलपूजन करत गुलालाची मुक्तपणे उधळण करत या क्षणाचा आनंदोत्सव साजरा केला.
यात दर्गनहळळी, शिर्पनहळळी, कुंभारी, रामपूर परिसरातील ग्रामस्थ या जलपूजनात मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्रारंभी ज्या ठिकाणी कर्देहळ्ळीचे शेतकरी कृष्णात पवार यांनी उपोषण सुरू केले होते त्याठिकाणी दुपारी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे व पदाधिकाऱ्यांनी पुन्हा उपस्थित राहत त्यांना पाणी पाजून उपोषण सोडविले. त्यानंतर दर्गनहळळी जवळ पाणी आलेल्या ठिकाणी जाऊन माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत कृष्णांत पवार यांच्याच हस्ते जलपूजन केले. यावेळी उजनी कालवा विभागाचे सहायक अभियंता ज्योतिर्लिंग पाटकर यांची उपस्थिती होती.
यावेळी माजी सभापती सिद्धार्थ गायकवाड, महेश बिराजदार, अनिल बर्वे, सिद्धाराम भंडारकवठे, देविदास कोळी, अमित ढोले, श्रीशैल माळी, विरूपाक्ष घेरडे, राजू बिराजदार, दीपक पाटील, लक्ष्मण बिराजदार, राजू हगरे, बसवराज दिंडुरे, संगप्पा बिराजदार, मोहन देडे आदी उपस्थित होते.
उजनीच्या पाण्याचा प्रवास सुरू
एकरुखमधून दर्गनहळळी कॅनॉलमध्ये पाणी सोडले गेले. रामपूर तलावामध्ये पाणी येत आहे. तीन ते चार दिवसात दक्षिणमधील दोन्ही तलाव भरून घेण्यात येईल. त्यानंतर दर्शनाळ कॅनॉलमध्ये पाणी सोडले जाणार आहे आणि ते पाणी पुढे हरणा नदीद्वारे कुरनूर धरणात येणार आहे.