सोलापूर : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेमधून सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत ३४० सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. या सौर कृषिपंपांमुळे शेतकºयांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाला असून त्यांची वीज बिलातून देखील मुक्तता झाली आहे.
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेच्या निकषानुसार पहिल्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत २१८० शेतकºयांना कोटेशन देण्यात आले आहे. त्यातील १३३८ शेतकºयांनी कोटेशनच्या रकमेचा भरणा केला आहे. शेतकºयांनी निवडलेल्या एजन्सीजना महावितरणकडून वर्कआॅर्डर देण्यात येत आहे. त्याप्रमाणे तीन एचपी क्षमतेचे २७८ आणि पाच एचपी क्षमतेचे ६२ असे एकूण ३४० सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत.
कृषिपंपांना पारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा करण्यासाठी ६३ केव्ही किंवा १०० केव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र उभारण्यात येतात व त्यावरील लघुदाब वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र वीजचोरी, इतर तांत्रिक बिघाड, विद्युत अपघात, रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांचा धोका यांसारख्या अडचणी येतात. दुर्गम व डोंगराळ भागात वीज यंत्रणेचे जाळे नसलेल्या भागात डिझेल इंधनाचा वापर करून कृषिपंप चालविले जातात. या सर्वांसाठी पर्याय म्हणून दिवसा तसेच शाश्वत व अखंडित वीजपुरवठा उपलब्ध व्हावा,यासाठी सौर कृषिपंप योजनेची अंमलबजावणी सुरू आहे.
अशी आहे योजना- यापूर्वी कृषिपंपासाठी वीजजोडणी घेतलेली नाही किंवा शुल्क भरूनही वीजजोडणी प्रलंबित आहे, अशा शेतकºयांना मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून सौर कृषिपंप देण्यात येत आहे. यामध्ये सोलर पॅनेल, वॉटर पंप संच, पंप नियंत्रण उपकरणे व इतर आवश्यक साहित्याचा समावेश आहे. तीन किंवा पाच एचपी क्षमतेच्या सौरपंपाद्वारे विहीर, नदी, शेततळे, कालव्यामधून पाण्याचा उपसा करून पाईपद्वारे पिकांना पाणी देता येते. - सौर कृषिपंपाला कोणत्याही इंधन वा पारंपरिक विजेची आवश्यकता नाही. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होणे, कमी-अधिक दाब, सिंगल फेज समस्या, पंप जळणे या समस्याही उद्भवत नाही.- महत्त्वाचे म्हणजे सुमारे २५ वर्षे सेवा देऊ शकणाºया सौर कृषिपंपाचा देखभाल खर्च अत्यंत कमी आहे. तसेच शेतकºयांची वीज बिलापासून सुद्धा मुक्तता होणार आहे. तीन व पाच एचपी क्षमतेच्या सौर कृषिपंप योजनेसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी १० टक्के आणि अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गासाठी ५ टक्के रक्कम लाभार्थी हिस्सा आहे.