अक्कलकोट : कोळेकर वाडी-सांगवी बु. (ता. अक्कलकोट) येथील एका शेतकऱ्याच्या वस्तीवर घराला आग लावून नुकसान केले. या प्रकरणाला चार उलटूनही पोलिसांकडून आरोपींविरोधात कोणतीही कारवाई झालेली नाही.
याबाबत सदाशिव घावटे यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या नातेवाईकातील लोकांनीच हे कृत्य केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. २९ आणि ३० मार्च या दोन दिवसांच्या कालावधीत हा प्रकार घडला आहे. याबाबत अक्कलकोट येथील उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार फिर्यादी सदाशिव घावटे यांचे कोळेकर- सांगवी शिवारात आठ एकर शेती आहे. शेजारी चुलत भावकीची शेती आहे. भोवताली भावकीतील सारेच वस्ती करुन राहतात. २९ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घावटे हे गावातील नवीन बांधकामाला पाणी मारण्यासाठी वस्ती सोडून बाहेर पडले. सहा वाजता वस्तीवर परत आले. त्यावेळी सर्जेराव घावटे, लक्ष्मण घावटे, बलभीम घावटे यांनी सदाशिव यांच्या वस्तीवर येऊन बांधावरची झाडे का तोडली म्हणत शिवीगाळ करून घर पेटवून देईन अशी धमकी दिली होती. त्यानंतर रात्री सारेच झोपी गेले. मध्यरात्री पावणेतीन वाजता दत्ता घावटे यांच्या ओरडण्याच्या आवाजाने जाग आली. तेव्हा वडील मरतो, मरतो असे ओरडू लागले. बाहेरून कडी घालण्यात आली होती. तेव्हा कसाबसा दरवाजा उघडून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. पण दरवाजा उघडला तेव्हा सर्जेराव व त्याचे सोबत आणखीन एक जण पळून जाताना त्यांच्या निदर्शनास आला.
---
शेतीपूरक साहित्य जळाले
घावटे यांचे वडील हे आगीत अडकले होते. वडिलांना झोपडीतून बाहेर काढले. विझवण्याचा प्रयत्न करुनही आग आटोक्यात आली नाही. त्यावेळी वस्तीत ठेवलेले दोन स्टार्टर, औषध मारण्याचा पंप, पाईप, केबल, वायर, खताचे पोते, असे शेती उपयोगी साहित्य व प्रापंचिक २० हजारांचे साहित्य जळाले. या घटनेचा तपास ठाणे अंमलदार वाळके हे करीत आहेत.
---
०२ अक्कलकोट
कोलेकर वाडी-सांगवी येथे सदाशिव घावटे यांच्या घराला आग लागली. घरातील साहित्य जाळून खाक झालेले दिसत आहे.