कळमण : उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण, साखरेवाडी येथील जवळपास १६० हून अधिक शेतकरी हे यापूर्वी झालेल्या अतिवृष्टी नुकसानीच्या मदत निधीपासून वंचित राहिले असून हा मदत निधी लवकरात लवकर वितरित करण्याची मागणी होत आहे.
मागील अतिवृष्टीत उत्तर सोलापूर तालुक्यात कळमण, साखरेवाडीतील बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. त्यानंतर तहसील कार्यालयाकडून तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून मदत निधी मागणी अर्ज भरुन घेतले होते. तलाठी कार्यालयाने कागदपत्रांच्या झेरॉक्सप्रती घेऊन तहसील कार्यालयाला पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येते. तहसील कार्यालयात शेतकऱ्यांनी चौकशी केली असता हा निधी आला आहे; मात्र तो पडून असल्याचे सांगितले जाते; मात्र उत्तर तहसील कार्यालय आणि तलाठी कार्यालयाच्या समन्वयाअभावी या मदतनिधीचे वाटप होऊ शकलेले नाही, सध्या खरीप पेरणी सुरू झाली असून शेतकरी या मदत निधीच्या प्रतीक्षेत आहेत.